Thursday, June 30, 2011

नवा गडी नवे राज्य



काळाची पावले ओळखून अभिनयाने जिवंत केलेले नाटक

काळ बदलला. तरूण वर्ग स्वतंत्र झाला. मुली स्वतःच्या मताने निर्णय घेऊ लागल्या. घर आपले...राजा-राणीचे हवे. दोघेही नोकरी करणारे. पैसा बक्कळ.. कपड्यात बदल झाला. सारे कसे मोकळे-ढाकळे आले. जमाना इंटरनेट, लॅपटॉपचा आला. घरात स्वयंपाकापेक्षा बाहेरून पार्सल मागविले की झाले... घराची सजावट बदलली ..तरी घराला भिंती हव्यातच. प्रायव्हसी म्हणतात ती. लग्ना आधीचे सारे लग्नानंतर चालत नाही. पतीला मैत्रीण चालते ..पण पत्नीला मित्र असणे हे बरे नव्हे.... ते न शोभणारे....
सांगायचे तात्पर्य....हे गडी नवे पण राज्य तेच जुने... पण नव्या कोंदणात सजविलेले.... तसे सांगायचे म्हणजे संशयकल्लोळ हो...
नवा गडी नवे राज्य....ह्या नाटकाने आपला शतकमहोत्सवही साजरा केलाय. उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या भुमिकांनी नाटकाला जिवंतपणा येतो... खरं म्हटले तर हे आजच्या काळाचे नाटक आहे.. जुनी पल्लेदार वाक्य नाहीत. स्वगते नाहीत. एकाच वेळी बराच काळ चालणारे प्रसंग नाहीत. वाक्यांना मराठी भाषेची पारंपारिक चौकट नाही..नवे शब्द आहेत. वाक्यांची गरज फक्त सांगण्यापुरती त्याला भाषेची झालर हवी कशाला?
एकूणच मालिकांमध्ये जसे तुकड्यांनी घटना पुढे जाच रहातात तसेच काहीसे छोटे प्रसंग. कांही बेडरूम प्रसंग. तसे बोल्ड. पण नाटकाला आवश्यक. आणि स्पष्ट सांगायचे झाले तर या नाटकाने तरूणाईचा वर्ग रंगमंदिराकडे खेचला गेला आहे. नाटकाला बुकींग चांगले होते. आणि दुसरे म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट यांचा इस्टंट अभिनय पहायला मिळतो. दोघांचेही चेहरे बोलतात. भावना दिसतात. त्याला प्रेमाचा स्पर्श होतो. नाते अधिक फुलून येते.
एकदंत क्रिएशन्सने रंगमंचावर आणलेले नाटक समीर विध्वंस यांनी ज्या नेमक्या रितीने ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाला गती दिली. गेयता आणली. प्रसंगाला सतत हलते ठेवले. कलावंतांना पुरेसे मोकळे सोडले. आणि परिणामकारक प्रयोग सादर करण्यात ते यशस्वी झालेत.
क्षितीज पटवर्धन यांनी हृषीकेश (उमेश कामत) आणि अमृता( प्रिया बापट) ह्या नवीन लग्न झालेल्या तरूण जोडप्यात उद्भभवलेल्या संसारातली ही मित्र कहाणी लिहली आहे ती संवादात कागदावर उतरवली आहे..क्षितीज पटवर्धन यांनी. चटकदार संवाद. त्याक्षणी चपखल वाटतील अशी वाक्ये. अधुनिक जोडप्यांना काळजात नेमकी घुसतील अशी शब्दरचना...यामुळे नाटक तुमच्यासमोर खिदळत रहाते.
पुरूषवर्गाला प्राधान्यक्रम देणारी आणि शेवटी ही सारी संशयाची धार शुल्लक करणारी ही घटनाक्रमाने सांगणारी काहीशी नाटकी कृत्रिमता नाटकाला सिनंमातल्या पटकथेचे रूप देते. एकमेकांना लग्नापूर्वीपासून ओळखणारे हे आधिचे प्रेमिक जेव्हा पती-पत्नी बनतात..तेव्हा पहिले काही दिवस सोडले तर संशयवाढविणारे जातात. अमृताचा मित्र हिम्मतराव जेव्हापासून घरी येतो..तेव्हापासून त्या दोघांची मैत्री तशीच खुल्ली..तीच खटकचे...नाटकाला तीथेच सुरवात होते. संशयाने सारा खेळ..पालटतो. वातावरण गंङीर बनत जाते...आणि शेवटी हे सारे संशयाचे बळी ठरतात..हे सिध्द झाल्यावर सुखांताने शेवट होतो.
त्यातच पुरूषाची जुनी मेत्रीण घरी आल्यावर तिने केलेले दावे ऐकल्यावर संसारातील दोघांनीही संयम सोडल्याचे नाटकलेखक दाखवितो. पुरूषी अहंकाराला सांभाळताना स्त्रीच्या दुख-या मनालाही तो फुंकर घालतो. कहाणी रंगवताना त्याला भावनेचा तात्पुरता मुलामा दिल्यासारखे वाटते. इथे हे नाटक काही सांगते म्हणून पहायाला जावू नका... ते तुमची करमणूक फुल्ल टाईमपास करणारे आहे... जुनाच विशय नवीन बाटतील भरून पुन्हा ताज्या दमाच्या कलाकारांकडून तुमच्यापर्यत आणलाय एवढेच.
मोकळेपणानी वावरणारी ही पात्रे तुम्हाला खुशीत ठेवतात. भावनेला हात घालून प्रसंगी तुमच्या डोळ्यात पाणीही आणतील... पण हे कसब आहे ते कलावंताचे. उमेश कामत, प्रिया बापट यांची जोडी रंगभुमिवर नवे राज्य गाजविणार हे सांगण्यासारखी मस्त दिसतात.. छान दिसतात. मोकळी वावरतात. त्यांच्या अबिनयात सहजपणा आहे. संवादात विलक्षण साधेपणा आहे. सफाई आहे. चेह-यावर बोलके भाव आहेत. टटका लावणारी मुद्रभिनयाची ताकद दोघांकडेहगी आई. म्हणूनच तेच या नाटकाचे खरे आकर्षण आहे.
हेमंत ढोणेंचा हिम्मतराव विलक्षण वेगळा..ग्रामिण मातीचा गंध घेऊन आलेला. रसरशीत , तरतरीत आणि गंमत सहजपणे कशी करावी ते सांगणारा वठलाय.त्यामानाने प्राजक्ता दातार थोड्या डाव्या वाटतात. त्याकेवळ भूमिका करतात.. त्या अंगावर येत नाहीत.
प्रसाद वालावरकारांच्या नेपथ्यातून आजचे मुंबईतले श्रीमंती घर , त्यातले महागडे रुप..सारेच दिसते. भासते. रंगसंगती उत्तम आहे. जसे पडद्यावर साकारणे गीत कथेला पूरक असते तसे ऋषीकेश कामेरकरांचे संगीत आणि त्यांनी तयार केलेले गीत नाटकाला मोहकता देते.
शितल तळपदे यांची पूरक प्रकाश योजना प्रसंगाना अदिक उठाव देते.
चंद्रकांत लोहकरे यांनी निर्मित केलेल्या या नाटकाने अजच्या काळाला पटेल. रुचेल आणि आवडेल असे नाटक देऊन नाटक हलकेफुलके आणि योग्य विषयावरचे आणले तर ते पेक्षक नक्कीच आपले मानतात याचे दर्शन घडविले आहे...



सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, June 15, 2011

विजय मागिकर साठीत



सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या
आमचा सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारा...कलावंताचा चाहता असणारा..
स्वरानंदात कार्यकुशलतेने कार्यरत असलेला विजय मागिकर साठीचा झाला..
त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्यासह
त्याच्या कलाजिवनाचा घेतलेला हा धावता आढावा...




प्रिय विजय,
परवा विनयाचा फोन आला तेव्हा जाणवले....तू साठीचा झालास.
आपण पीडीएत भेटलो. अभिनय येतो असा समज होता. पण भालबा केळकरांच्या दुस-या फळीत रमलो.
पडद्यामागचे कलावंत झालो. पडेल ते काम करून नाटक किंवा प्रसंग नाट्य दर्शनात
कधीतरी नगण्य भूमिकेत वावरलो. पण यामुळे व्याक्तिमत्व विकासाचा पाया घातला गेला.
नट म्हणून कधीतरी दिसू.. एखादी तरी छोटी भूमिका मिळेल अशी आशा बाळगून तीन-चार वर्ष पीडीएत रमलो.
चर्चा ऐकत गेलो. कानावर पडेल ते साठवत राहिलो. यातून एक नक्की झाले.
आपण नाटकाच्या पडद्याआडचे वारकरी. कधी ज्योती मेंहेंदळे..तर कधी राणी पारसनीस, तर कधी चंद्रकांत दिघे,
अजित सातभाई, दिलिप वेंगुर्लेकर यांच्या तालमी पहात गेलो. नट म्हणजे काय... त्या भूमिकेत वावरणे...
कसे ते पहात गेलो.. त्यातच रमत गेलो.
यातूनच निराशेचे..अपयशाचे ढग पदरी पडत गेले... सोबत राहिलो.
आज काहीतरी नवे शिकायला मिळेल या जिद्दीने डेक्कनवरच्या महिलाश्रमाच्या तळघरात त्यानाटकाच्या...
भालबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळालेही नाही.
मात्र एक झाले. तुझी मैत्री मिळाली. एकटाच कॉट बेसिसवर रहात असल्याने तुझ्या रेव्हेन्यू कॉलिनतल्या घराने
आयुष्यातले आनंदाचे क्षण दिले. नाना आणि आईंचा प्रेमाचा सहवास मिळाला. पुण्यातला एकटेपणा नाहीसा झाला.
पुढे विनयासारखी सखी तुझ्या आयुष्याच्या संसारात दाखल झाली. आणि तुमचे घर अधिक परिचयाचे झाले.
अर्थात याला तुझी प्रेमळ विचारपूस... मैत्रीची घट्ट विण... आणि मोठ्या भावासारखा दिलासा...सारेच मिळाले....

तुझ्या संसारावर वरूणरुपी नवे पर्व दाखल झाले. घराला घरपण झाले. नानांचे आणि आईंच्या मायेची सोबत लाभली.
तुझ्या घरच्या मोकळ्या वातावरणातून मैत्रीचा धागा जुळत गेला...गुंफत गेला... मने मोकळी झाली.
विजय मागीकर हे नाव पुढे माझ्या आयुष्यात कायमचे जोडले गेले.

विजय,
शिक्षणाच्या फारशा फंदात न पडता तुझ्या तरतरीत स्वभावाने आणि हजरजबाबीपणाने गरवारे कंपनीत
आबासाहेब गरवारेंचा पी ए म्हणून तु नोकरी पटकावलीस.
चार-पाच वर्षे ती केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे मनी घेतलेस.
लिक्विड साबणाचा पुरवठा करण्याचे नवे तंत्र आत्मसात केलेस. रेव्हेन्यू कॉलनीतल्या घरात मागच्या बाजूला
शेडमध्ये हा व्यवसाय दमदारपणे चालविलास. थोडिथोडकी नव्हे तर तीस-बत्तीस वर्षें.
मात्र तसे तुझे घर पाहिले की याला नोकरी-व्यवसाय करायची काय गरज असा प्रश्न मला नेहमीच पडे.
आजही घरात विद्यार्थ्य़ींसाठी खोल्या भाड्य़ाने देऊन तुझे छान चाललेय. मात्र स्वतःच्या जागेचा प्रश्न .
भाडकरूंच्या कटकटी . कोर्टाचे खेटे. यातून घर अगदी स्वतःचे बनविलेस.
आताही तुझ्या घराची ओढ लागावी अशी ती वास्तू आम्हा मित्रांना सारखी खुणावते आहे.

दिवसाचे काम संपले की तु कलेच्या प्रांतात रमलास . दिग्दनर्शनाच्या आवडीतून शापीत आणि
पुढचे पाऊल मध्ये तेही साध्य केलेस. शापितच्या वेळी तूझे असिस्टंट डायरेक्टरपद तुझी चित्रपटाबाबतची जाणीव
जागृत करून नवीन क्षेत्रात पुढचे पाऊल पडले. राजदत्तांच्या मार्गदर्शनाचा लाभ गोट्या या सिरियलमुळे तुला झाला.
पुढचे पाऊल मध्ये मानसीनेही (विनया) छान काम केले. यातून चित्रपट माध्यमात स्थायिक झाल्यसारखे वाटले.
हिंदीतही पद्मनाभ यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकण्याचा योग तुला आला.
खरे तर तू त्यातच करियर करायचा..पण नाही. तुझी भूक कलेची आणि कलावंतांच्या सहवासाचा अधिक होती.

विजय, तुझ्यामुळे विनय नेवाळकर (शापित), राजदत्त (दत्ता मायाळू), संजय ऊपाध्ये, श्रीकांत पारगावकर,
विठ्ठल वाघ, हिमांशू कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी, गोविंदराव बेडेकर, ...असे कितीतरी माझ्या परिचयाचे झाले.
राजन-साजन मिश्रांसारख्या बुजुर्ग गायकांनाही तुझा सहवास हवासा वाटतो.. ते मी पाहिले आहे..यापेक्षा काय हवे?
तुझ्या ओळखींतून पुण्याचे सांस्कृतिक क्षेत्र जवळून अनुभवता आले. जाणीव वाढली. संगीत, साहित्य, नृत्य,
आणि चित्रपट क्षेत्रात तुझा दबदबा हेवा वाटण्यासारखा वाढत राहिला.

मला आठवते पं. भिमसेन जोशींना भारतरत्न जाहिर झाला. तेव्हा तू मला त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले राघवेंद्र
आणि आनंद ..जी दोघेही पुण्यात धायरीत रहातात..त्यांची संगीत क्षेत्राला माहिती व्हावी म्हणून
ई-सकाळच्या माझ्या कार्यालयात आलास. आपण राघवेंद्र आणि आनंदयांच्यावर व्हिडीओ स्टोरी केली..
पुढे स्वरानंदच्या कार्यकारीणीला तुझ्या सारखा नवा कार्यकर्ता मिळाला. आमच्या सारख्या परिचितांना तुझी हक्काची साथ मिळाली.

तुला साद घातली की सारी गोष्ट पूर्ण होणार याची खात्री कित्येक मित्रांना आजही आहे.
म्हणून तर तुला तर बरोबर घेऊन जातात.. आजही...
तुही तेवढाच दिलदार पैशाच्या विचार न करता मित्रत्वाचे सारे बंध एकवटून तू मदतीचा हात देतोस.
केव्हाही बोलवा..विजय येणार याची खात्री असते . अगदी पुलंच्या नारायणा सारखा.
आज पुण्याच्या कलाक्षेत्रात तुझा दबदबा आहे. कार्यक्रमाची व्यवस्थापनाची काटेकोर बांधणी करणारा सूत्रधार
तुझ्या रूपात मिळाला आहे. श्रीधर फडकेंपासून मंजूषा कुलकर्णींपर्यत सारेच कलावंत तुझे बनले.
नव्हे तुझ्या स्वभावाने ते आपलेसे बनविलेस. मायग्रेनचा त्रास सोसूनही तू बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुठेही गेलास. अगदी प्रसंगी मारही खाल्लास...पण ते कुणाला कळूही न देता हे व्रत कायम ठेवलेस...
नेटाने सांस्कृतिक क्षेत्राचा वाटाड्या बनलास.. नवख्या कलावंतांचा मार्गदर्शक झालास......ध्यास एकच...
चांगली मंडळी उत्तम कार्यक्रम करणा-यांना आधार ,मदत करणे .
थोडक्यात म्हणजे....

तुझे मी पण हरविले गेले
नेमके करायचे ते राहूनच गेले
इतरांसाठी आयुष्य वेचताना
स्वतःसाठी जगणे राहूनच गेले

विजय, आता तु साठीत आलास. स्थिर राहून आनंद घे. तुझ्या मार्गदर्शनातून इतरांना उभारी दे. स्वतःसाठी..
कुंटुंबासाठी वेळ दे. वरूणला समजावून घे. मानसीच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न कर.
निवारा मिळालाय. आता कालानंद घे.
आतातरी तुला हवे तसे...स्वानंदी वागत रहा... बंधनांची नको करू तमा..
आनंद तर देशीलच.. पण स्वतःतला कलावंत ...संघटक, कुशल मार्गदर्शक बाहेर येवू देत..
तुझ्यात बरेच कांही आहे. बोलण्याचे भान आहे. सांगण्याचे तंत्र आहे. व्यवस्थापनातला मंत्र तुझ्यात आहे.
कलावंतांची फळी तुझ्यामागे उभी आहे. तु नवनिर्मितीचा भार उचल. सांस्कृतिक क्षेत्राला स्वतःचे भान दे.

तुझ्या साठीच्या प्रवासाचा पस्तीस वर्षाचा साक्षीदार असलेला,
तुझाच,

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Wednesday, May 18, 2011

आठवणींची शिदोरी

शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे. तशी आधी नोकरी केली ...पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला. नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. कवीतेतून शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कविताही रचतात. कथाही रचतात.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?

श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती, पुणे- ४११०३७ मोबा. ९८९०३४८८७७




आठवणींची शिदोरी

आठवणींची शिदोरी
घेऊन तू जाशी
मनात ग तुझ्या
माहेर जागविशी...
आठवेल ग तुला
तुझे बालपण
कधी आईचे
दूधभात भरवण...
आठवतील तुला
राग रूसव्याचे सण
आठवतील तुला
दुःखाचेही व्रण...
आठवेल तुला
तुझी शाळा शिक्षण
मिळता सुयश
आमंदीत होणं...
कळणार नाही तुला
तुझे मोठं होणं
आपसुक कुटंबाची
काळजी घेणं...
आठवेल कधी गाणं
कधी सुरेल वादन
चिंब रांगोळीतून
कलेचं जोपासणं...
संपून हे सारे
माठं होत जाणं
आणि एक क्षणी
सासरी जाणं...
आठवणींची फुलं
जात नाही सुकूनी
काळ कितीही गेला
येता पुन्हा फुलूनी....

Thursday, May 5, 2011

मराठी लावणी पोरकी झाली ...




मराठीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खेबूडकरांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपट विश्वावार शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. आज सकाळी कोल्हापूरमधील आधार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खेबुडकरांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याच्या गीतामुळे अनेक चित्रपट अजराअमर झाले आहेत. लावण्या हा जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपटाला दिलेले एक मोठे योगदान म्हणावे लागेल. ज्या काळी मराठी चित्रपट केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चित्रपट गाजत असे. त्या काळात खेबुडकर यांनी स्वतःच्या गीताने चित्रपट अजराअमर केले. खेबुडकर यांनी ३५० चित्रपटांमधून तब्बल पावनेतीन हजार गाणी लिहली आहेत.

पिंजरा,साधी माणसं आणि समाना अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

तुम्हावर केली मी...,राजा ललकारी...,कुठं कुठं जायचं हनिमूनला..., देवा तुझ्या दारी आलो...,ऐरणीच्या देवा तुला..., मला हो म्हणतात लवगी मिरची..., आकाशी झेप घे रे..., कोण होतीस तू... काय झालीस तू...; अशी त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या होठावर आजही कायम आहेत.

खेबुडकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

जगदीश खेबुडकर यांच्यावर केलेली कविता ... जीवनगाणे

बहरुनी पुष्पात साऱ्या , गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात साऱ्या, छंद माझा वेगळा
सूख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखि नसे
क्लेष मनिचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखाविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा

- कविता खेबुडकर (अमृता पाड़ळीकर)

(ही कविता जगदीश खेबुडकर यांच्या कन्या कविता खेबुडकर यांनी केलेली आहे ).

'कथाकथनातून समाजसेवा'


केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...


पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!

गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.

कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.

पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.

साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.

२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.

मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.

Monday, April 11, 2011

वसंत नाट्यवैभव




टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.

कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com

Tuesday, April 5, 2011

जरा याचाही विचार करा


भारतीय क्रिकेट मधील व्यक्तिपूजा अनेकांना क्रिकेट पासून दूर नेण्यास कारणीभूत ठरते आहे. नुकत्याच झालेल्या
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडूलकरच्या नगण्य १८ धावा होत्या अन इतरही बाबतीत तो काही
स्पृहणीय करू शकला नाही,पण माध्यमांनी जणू तेंडूलकरच्या मिडिया म्यानेजरची भूमिका घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा
चंगच बांधला होता. सामना सम्पल्यावर कर्णधाराची विजयी मिरवणूक काढण्या ऐवजी तेंडुलकरची काढणे हेही निषेधार्ह होते.
का तर म्हणे तो एक दिवसीय सामन्यातून निवृत्त होणार म्हणून!

हे कौतुक सम्पल्यावर तो निवृत्ती नाकारणार हे गृहीतच होते.
कारण जाहिरातीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत तो फक्त संघात असे पर्यंतच राहू शकतो,हे त्याला चांगलंच माहिती आहे.
या पूर्वीही अनेकदा वाईट खेळल्या नंतर खोट्या दुखण्याचं नाटक करून तेंडूलकरने आपण मुत्सद्दी, व्यवहारचतुर आणि राजकारणी
असल्याचे दाखवले आहे. रसिकांच्या वेड्या प्रेमामुळे आज सचिनने चांगले खेळण्याची गरजच उरली नाहीये.
त्याने फक्त टीम मधली एक जागा शक्य तितकी वर्षे अडवून ठेवावी अशी योजना त्याने आपल्या मध्यस्थांमार्फत करूनच ठेवलेली आहे.
आपण चर्चेत नाही हे लक्ष्यात येताच अत्यंत मुत्सद्दीपणाने मद्याची जाहिरात नाकारल्याची बातमी माध्यमांना देऊन त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले होते.
कोका कोलाची काही कोटीची जाहिरात करण्याचा अनुबंध मिळताच त्याची जाहिरात करायलाहि तो विसरला नाही.
क्रिकेट हा संघाचा खेळ आहे तो टेनिस प्रमाणे वैयक्तिक खेळ नाही. कारण असो नसो सतत फक्त एकाच खेळाडूची स्तुती होत राहिली तर संघ भावनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्या त्या वेळी कर्तृत्व गाजवणा-या खेळाडूंचे कौतुक होणे अत्यंत आवश्यक आहे. ओढून ताणून सचिनचे गुण गान करण्याची वृत्ती मिडीयाने बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्या शतकांपेक्षा देशाची हारजीत महत्वाची आहे,
हे भारतीय क्रिकेट रसिकांना कळणेहि महत्वाचे आहे. विश्वचषक धोनीच्या टीमने जिंकला आहे, सचिनच्या नव्हे!
फायनल मध्ये शेवटी चार धावा आवश्यक असताना षटकार फक्त धोनीच मारू शकतो, ते सचिनच्या आवाक्यात कधीच नव्हते आणि या पुढेही शक्य नाही.
सचिन क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याच्या आज पर्यंतच्या एकत्रित धावा मोजायच्या, आणि इतरांच्या मात्र फक्त एकाच सामन्यातल्या!

ब्रॅडमन यांचा विक्रम सचिन मोडूच शकत नाही, कारण ब्रॅडमन यांनी तो अत्यंत कमी सामने खेळून केलेला आहे. पण व्यक्तीपूजकांनी त्यासाठी सोयीस्कर असे निकष तयार केले आहेत. अनेकदा वाईट खेळूनही त्याला टीम बाहेरचा रस्ता दाखवला नाही,मात्र दुसरा एखादा खेळाडू एकाच सामन्यात नीट खेळू शकला नाही तर त्याला लगेच काढून टाकण्याची तत्परता बीसीसीआय आणि निवड समितीने दाखवली आहे. थोडक्यात काय तर सचिन हा कृत्रिम विक्रमवीर आहे. झालेला नव्हे होऊ दिलेला!

मंगेश वाघमारे ,पुणे
email- mangeshwaghmare91@yahoo.in