Friday, February 25, 2011

थरारेल वीट



स्वरभास्करा
नादपुत्रा
तळपत्या भास्करासम
ताप सोसताहेत
लोक
तप्त मनास शीतल करणारा
तुझा स्वर
नि, पोळलेल्यांना
स्वरानंद देणारा !
धुवांधार मर्दानी मल्हार स्वरांनी
कोमेजलेली मने
प्रफुल्लीत करणारा !
तुझा एक सच्चा
स्वर
दुभंगलेल्यांचा
अभंग
विठ्ठल
आसवांचे सांत्वन करणारा
वैश्विक जाणीवांना जोडणारा
रात्रीच्या धुंद सवाई गंधर्व
मैफिलीत
तुझे स्वर चांदणे होऊन बरसत
-- कधी कोसळती धारा
कधी प्रसन्न शिडकावा
कधी कधी करुणाही झरे !
मैफिल तुझी : मंत्रमुग्ध तल्लीनता
ब्रह्मानंदी टाळी !
मानवी संवेदनांना टोकदार करणारा
शब्दांना रडवणारा
शब्दांना खेळवणारा
शब्दांची दमछाक करणारा
करुण - आर्त - स्वर - भास्कर
सुंदर ते वेचून
सुंदर ते करून
पिढ्यानपिढ्या गारूड करणारा
संतवाणीच्या भक्तीस्वरांनी
शास्त्रीय संगीत ज्ञान
घरा-दारात, तळागाळात नेणारा
ममताळू
सीमा तरी कुठे होत्या
तुझ्या स्वरांना ?
स्वरांच्या लहरी
विविध लहरी
विश्व लहरी
मानवी ऐक्य
वैश्विक ऐक्य
साधणारा
अजूनी आपल्यातच........
आनंदयात्रीची स्वरयात्रा.......
अखंडित.......
ज्ञानियांच्या राजानंतर
संगीताच्या राजाची
समाधी लागली आहे !
टिपेच्या दाणेदार तानांची
मैफिल सजवीत आहेत
शांतता राखा.....
हळू बोला......
---- थरारेल वीट !



Suresh Tilekar
Pune
Ph.: 020-26330615

Tuesday, February 22, 2011

नाटकातील प्रायोगिकता - महेश एलकुंचवार


आमची प्रायोगिकता अधिकधिक अनुदार व संकुचित तर होवू लागली नाही? प्रायोगिकतेचा एक आम्हाला पटणारा कोश आमच्या भोवती विणून त्यातच आम्ही मग्न राहीलो, असे तर झाली नाही? आम्ही करतो तेच खरे (व म्हणून दुसरे करतात ते रद्दबातल), असा गंड तर आम्हा प्रायोगिकांमध्ये निर्माण झाला नाही? परिणामी आमच्या प्रायोगिकतेलाच कोती व अल्पजीवी तर केले नाही?

मुळात प्रायोगिकता म्हणजे परंपरेविरुद्ध बंडखोरी असे समीकरण आहे. पण जिच्याविरुद्ध बंड करायचे ती परंपरा आधी समजून घ्यावी लागते. येथे मी परंपरा हा शब्द फक्त नाट्यपरंपरा एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरत नसून जीवनाच्या सर्व अंगांमधली परंपरा, एका संपूर्ण जीवनशैलीची परंपरा एवढ्या व्यापक अर्थाने वापरत आहे. ते बंड अखेर जीवनामधल्या कुठल्य तरी अस्विकारणीय असलेल्या परंपरेविरुद्ध्च असते; कारण नाट्यपरंपरा ही अखेर त्या जीवनशैलीशी जुळलेली असते, किंबहुना तिच्यामधून उमलू आलेली असते. ही सर्व परंपरा समजून घ्यायची तर खूप अभ्यास हवा व पूर्वग्रहरहित, डोळस व्रुत्ती हवी. कुठल्याही देशातली नाट्यपरंपरा किंवा तीविरुद्धची बंडे ही काही निर्वात, निर्जन्तूक पोकळीत फुलत फळत नाहीत. त्या बंडखोरीमागे काही तात्विक विचार असावा लागतो व हा विचार नेहमीच जगण्याबद्दलच्या मूलभूत प्रश्नांमधून जन्मलेला असतो.

आपल्या नाटकामधली बंडखोरी जीवनविषयक तत्त्वचिंतनातून निर्माण झालेली आहे असे दिसत नाही. आपले बंड उपलब्ध शैलीविरुद्ध फक्त असते व ते एका निर्वात पोकळीत क्षण्काल घोंगावत राहाते. अश्या त-हेचे बंड वा प्रायोगिकता क्षणार्ध आपल्याला दिपवून टाकू शकते हे खरे, पण बहुदा ती काही काळ पेटल्यासारखी उजळते व स्वत:शीच जळून राख होते. परंपरा आपण सगळीच्या सगळी स्विकारत नसतो; कारण ती आपला चेहरा नित्य बदलते, बदलत्या काळाबरोबर नवे रूप घेते. हे असे होते कारण डोळस माणसे परंपरेतले कालबाह्य आहे ते वर्ज्य करून तिचे फक्त सत्त्व अंगी लावून घेतात. परंपरेचे सत्त्व व आधुनिकतेचा बळ ह्यांचा काही मेळ घालता आला, तर प्रायोगिकतेला एकाग्र व निश्चित दिशा मिळू शकते.

परंपरेचे भान असणे ह्याचा अर्थ एतद्देशीय असणे नव्हे. आपली परंपरा इतक्या संमिश्र विविध प्रभावाने घडत गेलीय की एतद्देशीय नकी काय ते ठरविता येणे कठीण आहे. आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यात, फक्त भारतीय परंपरांचा विचार करण्याऐवजी जागतिक परंपराअ समोरे जाण्याचा खुलेपणा व उमदेपणा दाखविता आला तर्च आपला सर्जनपिंड पुष्ट होत जाईल. जागतिक प्रभावांना व परंपराना आपण प्रतिरोध करतो, तो आपल्यात आत्मविश्वास कमी पडतो म्हणून तर नाही?



महेश एलकुंचवार

आख्यायिका बासरीच्या


बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो.... याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.
तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही.. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्या.
तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.

म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही………..!

मयूर मुकुंद आपटे

Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला





भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.

रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.

दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.

पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.

आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली होती हे माठे भाग्यच म्हणायचे.

दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.


Thursday, February 10, 2011

कलेची चव

ज्ञानी, महाज्ञानी,सर्वगुणसंपन्न असा समुदाय तुम्ही अनुभवलाय?

मी अनुभवलाय. एका शहरात.


खरे तर त्यांनीच मला त्यांची स्वत:ची ’ती अशी’ ओळख करवून दिलीय.जे लिहितोय ते स्वानुभवातुन लिहितोय.सांगोवांगी नाही.

या शहरातील लोकाना एक वेळ ’ढिल्ला’ महटले तर एवढा राग येणार नाही,पण जर कोणी ’अज्ञानी’ किंवा ’गावंढळ’ म्हटले तर त्यांच्या पचनीच पडत नाही. तिळपापड होतो.अंगाची अगदी लाही लाही होते.

इंटरनेट यायच्या आधी आणि आल्यानंतरही केवळ यांना आणि यांनाच सर्व जगाची माहिती असते वा असू शकते.भले यांच्या माहितीचा स्त्रोत केवळ दोनच वृत्तपत्रांशी निगडित असला तरी.

त्याचे कारणही आहे..’.गेला बाजार विद्यापीठातील ग्रंथालयात काम करणारा कोणीतरी सेवक त्यांचा दूरस्थ नातेवाईक असल्यामुळे जगातील सर्व ग्रंथ दोहो कर जोडून यांच्यापुढे सदैव उभे असतात,’असा भास वारंवार ते आपणा सर्वांना देत असतात.आणि हे अनुभवायला तुमच्या माझ्या सारखा नवखा त्यांच्यासमोर आला कि त्यांचा पतंग मस्त अवकाशात चंद्रापलिकडेही भरारी घ्यायला लागतो.

एखाद्या कवितेतील आशयाचा आनंद घेण्यापेक्षा त्यातील एका वेलांटीशी त्यांचा जीव खट्टू होवून अडकून राहतो.

मग ती कविता गेली उडत ,

जोपर्यंत ती वेलांटी यांच्या पठडीत बसत नाही तोपर्यंत यांचा जीव खालीवर होत राहतो.

यदाकदाचित यांच्या पोकळ ज्ञानघमेंडीचा तुम्हास कधी अनुभव आला तरी तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

केवळ तुमच्याशी नाही, तर सगळ्या जगाशीच या अशा अनेक विषयावरून त्यांचे कायम वाजत असते.



आपल्या नाकाशी किलोभर स्त्राव लोंबत असला तरी अमका ढमका कसा ’त्याच्या स्वप्नात चुकला’ यावर मार्निंग वाकला तासभर गुंतवून ठेवण्याचा अधिकार यांना दैवदत्त आहे.
आणि कमालीच्या इंटरेस्ट्ने तो वाजवत असतात.



त्यांच्या परखडपणा, स्पष्टवक्तेपणाचे तर क्या कहने?
’मी टरफले उचलणार नाही , मी शेंगा खाल्या नाहीत’ हे यांनी इतक्या वेळा घोकलेले आणि ओकलेले वाक्य असते कि
टिळक जिवंत असते तर त्यांनाही त्याचा अगदी वीट आला असता.
बरे टरफले मटारची आहेत आणि यांच्या तोंडात त्यातलाच मटार असला तरी...टरफले शब्द ऐकला कि त्यांचा ’असा परखडपणा’ बाहेर येणारच.मक्याच्या कणसाची पाने कुणी उचलायला सांगितले तर अर्धवट खालेल्ला बुट्टा तुमच्यासमोर नाचवून आधी शेंगांचा परखडपणा मांडतील.बरे टिळक रत्नागिरीचे..बाहेर गावचे.... तरीही यांचेच.


खरे तर , हे जरा उशीरा जन्माला आले अन्यथा सर्व संत मंहंत यांनी यांच्याच घरीच पाणी भरले असते.अधे मधे संत महंताच्या विविध परिक्षाही हे किंवा याचे सगे सोयरे उत्तीर्ण होत असतात.पढत मूर्खाची लक्षणे तर अगदी झोपेत सुद्धा पाठ म्हणून दाखवतील .पण जागे जाले की त्यातसुद्धा समर्थांनी थोडा बदल कसा करायला हवा होता, यावर तुमचा तास घेतील.

भारत तसा उत्सवप्रिय देश आहे,पण या मडळींची खासियतच काही विलक्षण आहे.ही मंडळी नुसती उत्सवप्रिय नाहीत तर,

ही मंडळी ’महोत्सवप्रिय’ आहेत.अनेक महोत्सव या शहरात बारा महिने चालू असतात.

या शहरात शिबिरे होत नाहीत. होतात फक्त महोत्सव.

...आरोग्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, कोंबडी महोत्सव, बचत महोत्सव, गायन महोत्सव, वादनमहोत्सव, पैठणी महोत्सव, ह्रुदय महोत्सव.

अन न चूकता ही मंडळी प्रत्येक महोत्सवास मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

भले मग मागच्या स्टालवर शाबूदाणा वडा झोडण्यात ’ गिरिजादेवी’ ऐकणे सुटले तरी हे त्यांच्या गावीही नसते.
खरे तर ते त्याची तमाच करीत नाहीत.कारण ’यांची मैफिल’, ’ हे’ बसल्यावरच सुरु होते अन ”हे’ उठले की तत्क्षणी संपते.

अकबर बादशाहा किंवा विक्रमादित्य हे तर ते स्वत:स समजतातच.पण त्याचबरोबर, ’मागणी तसा पुरवठा’ या तत्वानुसार on demand दरबारातील नवरत्नांचा रोलही एकेक करून ते आरामात निभावतात.
खरे तर त्याच्या कडे ९०० रत्नांची क्षमता आहे पण पुरेशा रसिक गणसंख्ये अभावी ते आवरते घेतात.
अथवा त्यांना असेही वाटते कि आपले गुण समजणे हे इतरांच्या आवाक्याच्या पलिकडचे आहे त्यामुळे आपणच पामर जनतेस सांभाळून घेणे भाग आहे.

ही माणसे चरितार्थासाठी किरकोळ कामेही करतात.पण त्यांच्या आवडीचे काम विचाराल तर ’दुस-यास कमी लेखणे’.

त्याच्या दुर्दैवाने अशा पद्धतीची नोकरी कोठे उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतीत ते विनामोबदला स्वयंरोजगाराचे तत्व अवलंबतात.

इतरांना त्यांची किंमत नसली तरी त्याची त्यांना फिकिर नसते.


मुकेश अंबानी या महाशयांकडे येत नाहीत, कारण ’ हे’ मुकेशला आपल्या घरी आमंत्रण देऊन बोलावत नाहीत म्हणूनच.

”तो तर केव्हाचा तयार बसलाय स्टार्टर मारून ’ अशी यांची धारणा.आणि समजा मुकेशदादा चुकून माकून कोठे यांना सापडलेच तर तुम्हास पेस्केल ( पगार ) आणि इन्क्रीमेंट किती? असे विचारण्याचे धारिष्ट्य यांच्या ठाई ठाई भरलेले आहे. यांच्या परवानगीशिवाय चालू असलेल्या इतर जगातील कोणत्याच कामाची यांना किंमत/पत्रास नसते.

यांच्या प्रत्येक गल्लीत ’आखिल भारतीय अबक मंड्ले’ असतात, ज्याची इतरत्र कोठेच शाखा नसते.
हे सगळे वाचल्यावर ज्यांना राग येणार आहे ती ”ही’ genuine माणसे नव्हेतच.
कारण सरळ आहे.
अनुल्लेखाने मारणे हाच यांचा साधा बाण आणि ब्रह्मास्त्र देखील..त्यामुळे इतरांनी उगीच यांचा पुळका घेऊ नये.

या नोट्मध्ये ब-याच शुद्धलेखनाचाच्या चुका जाणून बुजून करून ठेवलेल्या आहेत.

बाकी याच शहरात तासन्तास अभ्यास करणारी, सगळ्यांशी आपुलकीने वागणारी, प्रचंड सामाजिक कार्य करणारी अशी असंख्य व्यक्तीमत्वे माझे मित्र आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदरच आहे.अन तेही माझे मत जाणतातच.


पण फुकट रूबाब मारणा-यांबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे.
मित्रांनो यांच्या वागण्याचा ’त्रास आहे’ असे समजू नका.एक ’वैशिष्ट्यपूर्ण करमणूक’ देण्याचा मक्ता यांच्याकडे आहे ,
त्याचा आदर करा.
मला त्यांच्या कलेची चव समजायला जरा वेळ लागला.

तसा वेळ आपणापैकी कोणास लागू नये म्हणून हा पत्रप्रपंच
( हाही त्यांचाच लाडका शब्द बरका )

by

Shriniwas Deshpande

Tuesday, February 8, 2011

कुसुमांजली महोत्सव पुण्याला




नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी

थर्ड बेल एंटरटेन्मेंट प्रस्तुत "रंगोत्सव" - कुसुमांजली या महोत्सवाचे आयोजन पुण्याला केले आहे..

दि. २६ व २७ फेब्रु. २०११, बालगंधर्व रंग मंदीर येथे हा महोत्सव पार पडेल्.
दि. २७ फेब्रु. २०११ रोजी कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर होणार आहेत्.
यामध्ये कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील प्रसंग सादर करण्यासाठी आपल्यापैकी कुठला ग्रुप इछुक आहे का?
असल्यास लवकरात लवकर संपर्क करावा.

नाटकांमधील प्रसंग १५ ते २० मिनीटांचा असला तरी चालेल्. उत्तम दिग्दर्शकांद्वारे व अभिनेत्यांद्वारे त्याचे परिक्षण केले जाईल व त्यानुसार उत्तम अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक् व प्रसंग अशी बक्षीसे देण्यात येतील व त्याचबरोबर प्रत्येक ग्रुप ला सहभागास्तव सन्मानचिन्ह देण्यात येईल्.

Swapnil Raste
9822426254

संपादकांची जीभ कापली गेलीय...



‘अदृष्ट तरीही सत्य गोष्टींच्या भासाने कलावंत लौकिक चौकटीच्या पार जाण्याची धडपड करीत असतात
आणि इथेच त्यांच्या लौलिक अपयशाची आणि अध्यात्मिक आनंदाची सुरुवात होते.
यातून जाताना अवघे आयुष्य होरपळ होऊन जाते. जीवनसत्य प्रस्थापित करण्याऐवजी भाववून घेण्याची
ही धडपड कलावंताला दैवी असमाधान मिळवून देते. यातूनही ते जीवनसत्य शब्दांतून प्रकट करताना होणारा आटापिटा,
त्यात वारंवार येणारे अपयश यांतून कलावंतांची घडण होत जाते.
हे सगळे स्वीकारत गेले तरच कवी हा कवी होतो.
यापासून पळ काढणारा नुसताच पद्यकार म्हणून उरतो. हे इमान कसोशीने सांभाळता आले पाहिजे.
दिसामासाने ओटीपोटात वाढणारी आग आनंदाने जपली-जोपासली पाहिजे.
मला हे कितपत जमले आहे याचे उत्तर माझ्यापाशी नाही...

– गुरुनाथ धुरी
----------------------------------------------------------------


( विद्यमान पत्रकारितेवरचं एका कवीचं भाष्य आहे हे.वाचकांचं दुःख आणि खऱया पत्रकारांची खंत याहून वेगळी नसावी.)

1.

संपादकांची जीभ

कापली गेलीय

त्यांच्याच दाताखाली.

बोलता येत नाहीय बिचाऱयांना



...गाऱहाणी लिहिलेल्या जिभा

तळहातावर घेऊन लोक

रांगेत उभे

संपादकांचे क्षेम याचित



ः देश असा मुकाट नव्हता झाला कधी. बिच्चारा.



2.

किती उलथापालथी, विध्वंस

वृत्तपत्रभर

तरी दचकत नाही एकही शब्द.



3.

प्रत्येक अफवेची

होऊ शकत नाही

बातमी,



प्रत्येक बातमी मात्र

...असते स्वतःहून

उच्च दर्जाची अफवा.



4.

कवितेतील बातमी

मावत नाही कधीच

वृत्तपत्राच्या आख्ख्या पानात



(घटकापळाने-संतोष शेणई)



.


.