शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे. तशी आधी नोकरी केली ...पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला. नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. कवीतेतून शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कविताही रचतात. कथाही रचतात.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?
श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती, पुणे- ४११०३७ मोबा. ९८९०३४८८७७
आठवणींची शिदोरी
आठवणींची शिदोरी
घेऊन तू जाशी
मनात ग तुझ्या
माहेर जागविशी...
आठवेल ग तुला
तुझे बालपण
कधी आईचे
दूधभात भरवण...
आठवतील तुला
राग रूसव्याचे सण
आठवतील तुला
दुःखाचेही व्रण...
आठवेल तुला
तुझी शाळा शिक्षण
मिळता सुयश
आमंदीत होणं...
कळणार नाही तुला
तुझे मोठं होणं
आपसुक कुटंबाची
काळजी घेणं...
आठवेल कधी गाणं
कधी सुरेल वादन
चिंब रांगोळीतून
कलेचं जोपासणं...
संपून हे सारे
माठं होत जाणं
आणि एक क्षणी
सासरी जाणं...
आठवणींची फुलं
जात नाही सुकूनी
काळ कितीही गेला
येता पुन्हा फुलूनी....
Wednesday, May 18, 2011
Thursday, May 5, 2011
मराठी लावणी पोरकी झाली ...

मराठीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खेबूडकरांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपट विश्वावार शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. आज सकाळी कोल्हापूरमधील आधार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खेबुडकरांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याच्या गीतामुळे अनेक चित्रपट अजराअमर झाले आहेत. लावण्या हा जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपटाला दिलेले एक मोठे योगदान म्हणावे लागेल. ज्या काळी मराठी चित्रपट केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चित्रपट गाजत असे. त्या काळात खेबुडकर यांनी स्वतःच्या गीताने चित्रपट अजराअमर केले. खेबुडकर यांनी ३५० चित्रपटांमधून तब्बल पावनेतीन हजार गाणी लिहली आहेत.
पिंजरा,साधी माणसं आणि समाना अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.
तुम्हावर केली मी...,राजा ललकारी...,कुठं कुठं जायचं हनिमूनला..., देवा तुझ्या दारी आलो...,ऐरणीच्या देवा तुला..., मला हो म्हणतात लवगी मिरची..., आकाशी झेप घे रे..., कोण होतीस तू... काय झालीस तू...; अशी त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या होठावर आजही कायम आहेत.
खेबुडकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.
जगदीश खेबुडकर यांच्यावर केलेली कविता ... जीवनगाणे
बहरुनी पुष्पात साऱ्या , गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात साऱ्या, छंद माझा वेगळा
सूख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखि नसे
क्लेष मनिचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखाविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा
- कविता खेबुडकर (अमृता पाड़ळीकर)
(ही कविता जगदीश खेबुडकर यांच्या कन्या कविता खेबुडकर यांनी केलेली आहे ).
'कथाकथनातून समाजसेवा'

केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...
पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!
गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.
कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.
पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.
साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.
२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.
मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.
आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.
Monday, April 11, 2011
वसंत नाट्यवैभव


टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.
कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com
Tuesday, April 5, 2011
जरा याचाही विचार करा

भारतीय क्रिकेट मधील व्यक्तिपूजा अनेकांना क्रिकेट पासून दूर नेण्यास कारणीभूत ठरते आहे. नुकत्याच झालेल्या
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडूलकरच्या नगण्य १८ धावा होत्या अन इतरही बाबतीत तो काही
स्पृहणीय करू शकला नाही,पण माध्यमांनी जणू तेंडूलकरच्या मिडिया म्यानेजरची भूमिका घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा
चंगच बांधला होता. सामना सम्पल्यावर कर्णधाराची विजयी मिरवणूक काढण्या ऐवजी तेंडुलकरची काढणे हेही निषेधार्ह होते.
का तर म्हणे तो एक दिवसीय सामन्यातून निवृत्त होणार म्हणून!
हे कौतुक सम्पल्यावर तो निवृत्ती नाकारणार हे गृहीतच होते.
कारण जाहिरातीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत तो फक्त संघात असे पर्यंतच राहू शकतो,हे त्याला चांगलंच माहिती आहे.
या पूर्वीही अनेकदा वाईट खेळल्या नंतर खोट्या दुखण्याचं नाटक करून तेंडूलकरने आपण मुत्सद्दी, व्यवहारचतुर आणि राजकारणी
असल्याचे दाखवले आहे. रसिकांच्या वेड्या प्रेमामुळे आज सचिनने चांगले खेळण्याची गरजच उरली नाहीये.
त्याने फक्त टीम मधली एक जागा शक्य तितकी वर्षे अडवून ठेवावी अशी योजना त्याने आपल्या मध्यस्थांमार्फत करूनच ठेवलेली आहे.
आपण चर्चेत नाही हे लक्ष्यात येताच अत्यंत मुत्सद्दीपणाने मद्याची जाहिरात नाकारल्याची बातमी माध्यमांना देऊन त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले होते.
कोका कोलाची काही कोटीची जाहिरात करण्याचा अनुबंध मिळताच त्याची जाहिरात करायलाहि तो विसरला नाही.
क्रिकेट हा संघाचा खेळ आहे तो टेनिस प्रमाणे वैयक्तिक खेळ नाही. कारण असो नसो सतत फक्त एकाच खेळाडूची स्तुती होत राहिली तर संघ भावनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्या त्या वेळी कर्तृत्व गाजवणा-या खेळाडूंचे कौतुक होणे अत्यंत आवश्यक आहे. ओढून ताणून सचिनचे गुण गान करण्याची वृत्ती मिडीयाने बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्या शतकांपेक्षा देशाची हारजीत महत्वाची आहे,
हे भारतीय क्रिकेट रसिकांना कळणेहि महत्वाचे आहे. विश्वचषक धोनीच्या टीमने जिंकला आहे, सचिनच्या नव्हे!
फायनल मध्ये शेवटी चार धावा आवश्यक असताना षटकार फक्त धोनीच मारू शकतो, ते सचिनच्या आवाक्यात कधीच नव्हते आणि या पुढेही शक्य नाही.
सचिन क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याच्या आज पर्यंतच्या एकत्रित धावा मोजायच्या, आणि इतरांच्या मात्र फक्त एकाच सामन्यातल्या!
ब्रॅडमन यांचा विक्रम सचिन मोडूच शकत नाही, कारण ब्रॅडमन यांनी तो अत्यंत कमी सामने खेळून केलेला आहे. पण व्यक्तीपूजकांनी त्यासाठी सोयीस्कर असे निकष तयार केले आहेत. अनेकदा वाईट खेळूनही त्याला टीम बाहेरचा रस्ता दाखवला नाही,मात्र दुसरा एखादा खेळाडू एकाच सामन्यात नीट खेळू शकला नाही तर त्याला लगेच काढून टाकण्याची तत्परता बीसीसीआय आणि निवड समितीने दाखवली आहे. थोडक्यात काय तर सचिन हा कृत्रिम विक्रमवीर आहे. झालेला नव्हे होऊ दिलेला!
मंगेश वाघमारे ,पुणे
email- mangeshwaghmare91@yahoo.in
Thursday, March 31, 2011
मराठी संस्कृती

शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी...
वांग्याचे भरीत....
गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी...
केळीच्या पानातली भातची मूद आणि त्यावरचे वरण..
उघड्या पायांनी तुडविलेला पंचगंगेचा काठ...
मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...
दुस-याचा पाय चुकून लागल्यावरदेखील अपण प्रथम केलेला नमस्कार..
दिव्या दिव्या दिपत्कार..
आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी..
मारूतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी..
दस-याला वाटायची आपट्याची पाने..
पंढरपूरचे धूळ आणि अबूर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...
सिंहगडावर भरून आलेली छाती ...आणि....
दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घटदार मडके घडावे तसा अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा.
इति...पु.ल.देशपांडे
Tuesday, March 29, 2011
तीन दशकांची समाधानपूर्ती--झलक..


महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.
रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.
इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.
स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.
पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....
झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.
तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.
कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276
http://www.zalakpune.com/
http://www.metacafe.com/watch/4202757/zalak_promo/
Subscribe to:
Posts (Atom)