Monday, April 11, 2011

वसंत नाट्यवैभव




टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.

कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com

Tuesday, April 5, 2011

जरा याचाही विचार करा


भारतीय क्रिकेट मधील व्यक्तिपूजा अनेकांना क्रिकेट पासून दूर नेण्यास कारणीभूत ठरते आहे. नुकत्याच झालेल्या
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडूलकरच्या नगण्य १८ धावा होत्या अन इतरही बाबतीत तो काही
स्पृहणीय करू शकला नाही,पण माध्यमांनी जणू तेंडूलकरच्या मिडिया म्यानेजरची भूमिका घेऊन त्याला प्रसिद्धी देण्याचा
चंगच बांधला होता. सामना सम्पल्यावर कर्णधाराची विजयी मिरवणूक काढण्या ऐवजी तेंडुलकरची काढणे हेही निषेधार्ह होते.
का तर म्हणे तो एक दिवसीय सामन्यातून निवृत्त होणार म्हणून!

हे कौतुक सम्पल्यावर तो निवृत्ती नाकारणार हे गृहीतच होते.
कारण जाहिरातीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत तो फक्त संघात असे पर्यंतच राहू शकतो,हे त्याला चांगलंच माहिती आहे.
या पूर्वीही अनेकदा वाईट खेळल्या नंतर खोट्या दुखण्याचं नाटक करून तेंडूलकरने आपण मुत्सद्दी, व्यवहारचतुर आणि राजकारणी
असल्याचे दाखवले आहे. रसिकांच्या वेड्या प्रेमामुळे आज सचिनने चांगले खेळण्याची गरजच उरली नाहीये.
त्याने फक्त टीम मधली एक जागा शक्य तितकी वर्षे अडवून ठेवावी अशी योजना त्याने आपल्या मध्यस्थांमार्फत करूनच ठेवलेली आहे.
आपण चर्चेत नाही हे लक्ष्यात येताच अत्यंत मुत्सद्दीपणाने मद्याची जाहिरात नाकारल्याची बातमी माध्यमांना देऊन त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले होते.
कोका कोलाची काही कोटीची जाहिरात करण्याचा अनुबंध मिळताच त्याची जाहिरात करायलाहि तो विसरला नाही.
क्रिकेट हा संघाचा खेळ आहे तो टेनिस प्रमाणे वैयक्तिक खेळ नाही. कारण असो नसो सतत फक्त एकाच खेळाडूची स्तुती होत राहिली तर संघ भावनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्या त्या वेळी कर्तृत्व गाजवणा-या खेळाडूंचे कौतुक होणे अत्यंत आवश्यक आहे. ओढून ताणून सचिनचे गुण गान करण्याची वृत्ती मिडीयाने बदलण्याची गरज आहे. आणि त्याच्या शतकांपेक्षा देशाची हारजीत महत्वाची आहे,
हे भारतीय क्रिकेट रसिकांना कळणेहि महत्वाचे आहे. विश्वचषक धोनीच्या टीमने जिंकला आहे, सचिनच्या नव्हे!
फायनल मध्ये शेवटी चार धावा आवश्यक असताना षटकार फक्त धोनीच मारू शकतो, ते सचिनच्या आवाक्यात कधीच नव्हते आणि या पुढेही शक्य नाही.
सचिन क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्याच्या आज पर्यंतच्या एकत्रित धावा मोजायच्या, आणि इतरांच्या मात्र फक्त एकाच सामन्यातल्या!

ब्रॅडमन यांचा विक्रम सचिन मोडूच शकत नाही, कारण ब्रॅडमन यांनी तो अत्यंत कमी सामने खेळून केलेला आहे. पण व्यक्तीपूजकांनी त्यासाठी सोयीस्कर असे निकष तयार केले आहेत. अनेकदा वाईट खेळूनही त्याला टीम बाहेरचा रस्ता दाखवला नाही,मात्र दुसरा एखादा खेळाडू एकाच सामन्यात नीट खेळू शकला नाही तर त्याला लगेच काढून टाकण्याची तत्परता बीसीसीआय आणि निवड समितीने दाखवली आहे. थोडक्यात काय तर सचिन हा कृत्रिम विक्रमवीर आहे. झालेला नव्हे होऊ दिलेला!

मंगेश वाघमारे ,पुणे
email- mangeshwaghmare91@yahoo.in