Tuesday, January 17, 2012

लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी `व्हायोलिन गाते तेंव्हा..`
सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत


दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे १२ फेब्रुवारी २०१२ रोजी ``सांस्कृतिक
पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.

पुण्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. . सदर कार्यक्रम बालशिक्षण
संस्थेच्या ,मयूर कॊलिनी (कोथरुड) ,पुणे येथे १२ फेब्रुवारी, रविवारी
सकाळी १० वाजता होणार आहे.

सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.


वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत.

आपल्या सारख्या जाणकार आणि उदार रसिक आश्रयदात्यांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.या साठी आपणतर मदतीचा हात द्यालच.
पण इतरांना सांगून स्व.बाबा आमटेंनी स्थापन केलेल्या कार्यासाठी आपल्या मित्रांना
आणि माहितीच्या संस्थांनाही मदतीचे आवाहन कराल याची खात्री बाळगतो.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीही मदत स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे.
सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
9552596276

Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवणउदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त वाहिलेली ही शब्दांजली....


संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.
आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.

दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.

`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, January 4, 2012

पुरस्काराचे मोल..अनमोल...

पहिल्या पुरस्काराचे मोल..अनमोल...
गेली ३२ वर्षे मी व्हायोलिन वादक म्हणून विविध कार्यक्रम अनेक संस्थांमधून केले. व्हायोलिनची साथ करताना जो आनंद घेतला तो समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेह-यावर मी अनेकविध पध्दतीने अनुभवला. माझे वडिल आणि गुरु पं. भालचंद्र देव यांच्या बरोबर स्वतंत्र व्हायोलिन वादनाच्या अनेक मैफलीही केल्य़ा. काही ठिकाणी मीही स्वतंत्र व्हायोलिन वादनाचा कार्यक्रमही सादर केला. मात्र आज इतक्या वर्षानंतर का होईना पहिला पुरस्कार मिळाला. माझ्यालेखी त्याचे मोल अनमोल आहे.


देशस्थ ऋग्वेदी व्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे यंदाचा डॉ. गजानन रमाकांत एकबोटे यांनी ठेवलेल्य़ा ठेवीच्या व्याजातून मिळालेला `संगीत सेवे`साठी पुरस्कार मला जाहिर झाला. तो पुरस्कार ८ जानेवारी २०१२ ला मुक्तांगणच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या सभागृहात ( अरण्येश्वर रस्ता, पुणे- ९) समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.


या निमित्ताने माझ्या मनात आलेल्या भावनेला शब्दबध्द करुन मी यातून वाट करुन देत आहे. आपण माझी व्हायोलिनसेवा अनुभवली आहेच..ही शब्दसेवाही गोड मानून मला यापुढच्या वाटचालीस आशिर्वाद द्याल अशी खात्री आहे.

--------------------------------------------------


गेली तीसपेक्षा अधिक वर्षे मी संगीत क्षेत्रात व्हायोलिन वादनाच्या रुपाने आपली सेवा रसिकांसमोर सादर करीत आहे. रसिकांचा भरभरुन प्रतिसाद माझ्या विविध कार्यक्रमांना मिळतो आहे ,
आजही मला आपल्यासारखे दर्दी श्रोते समोर दिसत आहेत.

कलाकार हा रसिकांच्या पावतीचा भुकेला असतो. मूठभर काळजामध्ये ढीगभर स्वप्न बाळगून माणूस जगत असतो आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धावत असतो. पण कलाकाराचे मात्र एकच स्वप्न असते. ते म्हणजे आपल्या कष्टाचं कधीतरी चीज व्हावं. ते स्वप्न जेव्हा अशा संस्थांकडून पुरस्काराच्या रुपाने पूर्ण होतं. तो कलाकाराचा खरा आनंद असतो.
आज मला `संगीतसेवा` या नावाने जो पुरस्कार मिळाला आहे, त्याचा खरचं मला खूप आनंद झाला आहे.

कोणताही कलाकार हा आयुष्यभर संगीताची सेवाच करीत असतो. आणि संगीतसेवा म्हणजेच ईश्वरसेवा.
ईश्वरसेवा झाली की आशिर्वाद सतत आपल्या मस्तकी असतो. त्या आशीर्वादाच्या बळावर आणि रसिकांच्या प्रेमावरच
कलावंत यशस्वी होतो. त्याला पुढच्या वाटचालीसाटी बळ मिळते.

असं म्हणतात की, परमेश्वर दर दिवशी एका ठराविक वेळी अमृतकणाची एक ओंजळ पृथ्वीवर टाकतो. ते अमृतकण ज्यांच्या हातावर पडतात ते वादक होतात. ज्यांच्या पायावर पडतात ते नर्तक होतात. ज्यांच्या वाणीवर पडतात ते चांगले किर्तनकार होतात, सूत्रसंचालक होतात आणि ज्यांच्या मनावर पडतात ते असे देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तॉजक संस्थेसारखे दुस-याचे कौतूक करणारे, पुरस्कार प्रदान करणारे मोठ्या मनाचे लोक असतात.

या पुरस्कारासाठी माझी निवड केलेल्या निवड समितीच्या मंडळींचे आणि संस्थेच्या सा-या पदाधिका-यांची..विशेषतः श्री. शंकर दामोदरे यांची मी आभारी आहे.

माझ्याकडून आयुष्यभर अशीच संगीत सेवा होवो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करते.


सौ.चारुशीला गोसावी, पुणे.
charusheelagosavi@gmail.com
9421019499