Wednesday, May 18, 2011

आठवणींची शिदोरी

शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे. तशी आधी नोकरी केली ...पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला. नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. कवीतेतून शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कविताही रचतात. कथाही रचतात.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?

श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती, पुणे- ४११०३७ मोबा. ९८९०३४८८७७




आठवणींची शिदोरी

आठवणींची शिदोरी
घेऊन तू जाशी
मनात ग तुझ्या
माहेर जागविशी...
आठवेल ग तुला
तुझे बालपण
कधी आईचे
दूधभात भरवण...
आठवतील तुला
राग रूसव्याचे सण
आठवतील तुला
दुःखाचेही व्रण...
आठवेल तुला
तुझी शाळा शिक्षण
मिळता सुयश
आमंदीत होणं...
कळणार नाही तुला
तुझे मोठं होणं
आपसुक कुटंबाची
काळजी घेणं...
आठवेल कधी गाणं
कधी सुरेल वादन
चिंब रांगोळीतून
कलेचं जोपासणं...
संपून हे सारे
माठं होत जाणं
आणि एक क्षणी
सासरी जाणं...
आठवणींची फुलं
जात नाही सुकूनी
काळ कितीही गेला
येता पुन्हा फुलूनी....

Thursday, May 5, 2011

मराठी लावणी पोरकी झाली ...




मराठीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खेबूडकरांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपट विश्वावार शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. आज सकाळी कोल्हापूरमधील आधार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खेबुडकरांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याच्या गीतामुळे अनेक चित्रपट अजराअमर झाले आहेत. लावण्या हा जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपटाला दिलेले एक मोठे योगदान म्हणावे लागेल. ज्या काळी मराठी चित्रपट केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चित्रपट गाजत असे. त्या काळात खेबुडकर यांनी स्वतःच्या गीताने चित्रपट अजराअमर केले. खेबुडकर यांनी ३५० चित्रपटांमधून तब्बल पावनेतीन हजार गाणी लिहली आहेत.

पिंजरा,साधी माणसं आणि समाना अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

तुम्हावर केली मी...,राजा ललकारी...,कुठं कुठं जायचं हनिमूनला..., देवा तुझ्या दारी आलो...,ऐरणीच्या देवा तुला..., मला हो म्हणतात लवगी मिरची..., आकाशी झेप घे रे..., कोण होतीस तू... काय झालीस तू...; अशी त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या होठावर आजही कायम आहेत.

खेबुडकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

जगदीश खेबुडकर यांच्यावर केलेली कविता ... जीवनगाणे

बहरुनी पुष्पात साऱ्या , गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात साऱ्या, छंद माझा वेगळा
सूख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखि नसे
क्लेष मनिचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखाविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा

- कविता खेबुडकर (अमृता पाड़ळीकर)

(ही कविता जगदीश खेबुडकर यांच्या कन्या कविता खेबुडकर यांनी केलेली आहे ).

'कथाकथनातून समाजसेवा'


केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...


पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!

गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.

कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.

पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.

साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.

२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.

मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.