Monday, August 10, 2015

आजही सुधीर फडके यांची महती कायम..

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे युगकर्ते ..राष्ट्रभक्त..शास्त्रीय संगीताचे जाणकार..मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताने सुवर्णाचे पान निर्माण करणारे संगीतकार..ज्येष्ठ गायक..गीतरामायण भावपूर्णतेने आणि तन्मयतेने सादर करणारे थोर गायक..सुधीर फडके  .. उर्फ बाबुजी...त्यांची एकलव्याप्रमाणे भक्ती करून त्यांच्या गायकीचे टप्पे आपल्यापरिने रसिकांच्या मनात रुजविणारे त्यांच्या संगीताचे अभ्यासक आणि एके काळी बाबुजींच्या गाण्यानी चैत्रबन मंतरून टाकणारे गायक श्रीपाद उब्रेंकर यांनी ९ ऑगस्टला पुण्यात एस एम जोशी रंगमंचावर पुन्हा एकदा संगीतकार सुधीर फडके यांच्या चित्रफितीतून आणि त्यांच्या गाण्यांच्या पुनश्च दर्शनाने श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले.. हा त्यांचा कार्यक्रम कदाचित पंचवीसावा तरी असावा..
गुरूंचे स्मरण करून त्यांच्यातल्या गुणांना आणि व्यक्तित्वाला मनोभावे वंदन करण्यासाटी श्रीपाद उब्रेंकर यांनी स्मरण बाबुजींचे केवळ ध्वनिचित्रफितीतूनच नव्हे तर दोन तयारीच्या गायकांकडून म्हणजे पुण्याचे राजेश दातार आणि कोल्हापूरच्या..डॉ. भाग्यश्री मुळे ...( ज्यांनी सुधीर फडके यांचे सुगम संगीतातील योगदान या विषयावर पीएच डी करून एस एन डी ची विद्यापिठाची डॉक्चरेट मिळविली)..यांच्याकडून काही गाण्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करुन संगीतकार सुधीर फडके यांच्या अविट गीतांचे गायन एकविले.
सर्वात्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आर्थिक मदत केली आणि तो सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला..पुणेकर रसिकांना म्हणून तर सुन्हा सुधीर फडके यांच्या संगीताची मोहिनी अनुभवयाला मिळाली..

आपल्या गायकीच्या सुरेल स्वरातून जेव्हा भाग्यश्री मुळे या सुखांनो या...या गीतांच्या आरंभीची आलापी करतात..तेव्हाच आजचा कार्यक्रम रंगणार हे नक्की होते...पुढे राजेश दातार स्वर आले दुरुनी..आणि प्रथम तुज पाहता..या दोन गाण्याची फर्माईश सादर करतात..तेव्हा तर रसिक पुन्हा एकदाचा ( वन्स मोअर) नारा देऊन..मुंबईचा जावई चित्रपटातील रामदास कामत यांच्या गायकीला अजुनही किती छान दाद देतात  ते कळते.. त्यातच उपेंद्र भट यांनी रामदास कामत यांना दोन डिग्री ताप असूनही बाबुजींनी हे गाणे कसे रकॉर्ड केले त्याची कहाणी एकविली.


बैठकिची लावणी..काहो धरिला मजवरी राग...तेवढ्यात ठसक्यात आणि लयदार पध्दतीने भाग्यश्री मुळे य़ांनी सादर केले..तर नविन आज चंद्रमा..हे युगलगीतही दोघांनी गायले.. झाला महार पंढरीनाथ..हा प्रासादिक अभंग.आणि गीतरामायणातील..तोडीता फुले ही...माणिक वर्मांचे गीत गायले भाग्यश्री मुळे यांनी..आणि अखेरीस देशभक्तिने ओतप्रोत रसरसलेले साने गुरुजी यांचे बलसागर भारत होवो..राजेश दातार जेव्हा भावपूर्ण आणि जोशपूर्ण म्हणतात..तेव्हा रसिक तन्मय होऊन..त्यांच्या सूरात आपला सूर मिसळून एकतानता घडवू आणतात..
मिलिंद गुणे आणि अभिजीत जायदे तसेच प्रसाद जोशी यांच्या हार्मोनियम, तबला आणि तालवाद्याच्या साथीशिवाय गाण्याला रंगत आलीच नसती..हे ही नमूद करणे उचित आहे..

पूर्वाधाचा हा तास श्रीपाद उब्रंकरांनी आपल्या पुणेरी..स्पष्टतेच्या फटक्यांनी घेतला..त्यात आजचे गाय़क पुरेसे तालिम करुन गाणी गात नाहीत..वगैरे शेरे मारून घेतले. सुधीर फडके एक व्यक्ति..एक कलाकार आणि श्रेष्ट संगीतकार म्हणून किती थोर होते..ते आजच्या पिढीला कळावे यासाठी हा ध्यास घेऊन कार्यक्रम सादर केल्याचे ते सांगतात..तेव्हा रसिक त्यांच्याही परिश्रमातून सादर झालेल्या कार्यक्रमाला टाळ्यांनी दाद देतात..
उत्तरार्धात जेव्हा बाबुजी ध्वनिचित्रफितीतून ऐकता येतात..तेव्हा त्यांच्या बॉडिलॅंग्वेज मधून त्यांच्या सहजी पण भावपूर्ण गायकीचे पुरेपुर दर्शन घडत रहाते..
एका क्षणी हिदी चित्रपटसृष्टीत काही मोजक्या चित्रपटांना संगीत देणारे बाबुजी मराठीत पुन्हा आले..ते बरे झाले..म्हणून तर मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्णकाळ लाभला...गीतरामायण..सिध्द झाले....श्रीपाद आपल्या ओघवत्या निवेदनात सांगत होते..
पुलंच्या घरी पं. कुमार गंधर्व यांना काही गाणी ऐकविल्यानंतर ते म्हणाले ..तुम्ही गाता चांगले..पण त्यात आत्मा नाही...मग इंदूरच्या आपल्या गणेशोत्साव आपले गाणे घरी ठेऊन जेव्हा ते मिठी मारून फडके यांच्या गाण्यावर खूष होऊन..आपल्या शिष्यांना सांगतात..की गाण्यात आत्मा कसा असतो..ते पहायचे असेल तर सुधीर फडके  यांचे गाणे ऐका..हे सांगतात..तेव्हा कलावंतांची एकमेकांवर असणारी श्रध्दा आणि भक्ति यांचे पुरेपूर दर्शन होऊन...ते ऐकताना आपलेही डोळे पाणावतात..

पावणेदोन तासांच्या ध्वनिचित्रफितीचा हा कार्यक्रम इतका श्रवणीय आणि पाहण्याजोगा आहे...की असे कलावंत मराठीत निर्माण झाले  यांचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही..तो पुन्हा पुन्हा पाहावा यासाठी उब्रेंकरांनी तो सादर करावा यासाठी रसिक आणि तमाम मराठी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील यात शंका नाही..
बाबुजींचे सारे पैलू पाहण्यासाठी जी श्रीपाद उब्रेंकर यांनी जी एकलव्याच्या भक्तिने जी मेहनत घेतली त्याला सालाम करावासा वाटतो..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

1 comment:

  1. Hats off to Shripad Umbrekar, Rajesh Datar, Dr. Bhagyashree Mule and all artists for such a wonderful event.

    ReplyDelete