Monday, August 26, 2024

रौप्यमहोत्सवी श्रीनिवास संगीत विद्यालय..

श्रीनिवास विष्णुपंत काळे ,माझे वडील..! संगीताची त्यांना प्रचंड आवड ,कोर्टात सर्व्हिस ला त्यामुळे त्यांना स्वतः साठी रियाज करायला वेळ मिळत नसे. रात्री ९ नंतर त्यांना गाणं शिकवायला त्यांचे गुरू पंडित केंडेबुवा येत असत. मग वेळेचं भान नसे गुरूंशिष्यां ना . मी अगदीच लहान होते. वडिलांची केंडेबुवा देत असलेली तालीम ऐकतच झोपत असे आणि यांतूनच मला ही संगीताची आवड निर्माण झाली .पुढे वडील फारच लवकर गेले ,पण जातांना चा प्रत्येक दिवस ते मला सांगायचे ,"मी काय आज असेन उद्या नसेन पण तू गाणं सोडायचं नाही " मी माझी संगीत आराधना करता करता च वडिलांच्या नावाने संगीत विद्यालय सुरू केले. आणि पाहता पाहता या विद्यालयात येणाऱ्या सर्वांच्या सहकार्याने पंचविशीत पदार्पण केले आहे ,याचा खूप आनंद होतो आहे. श्रीनिवास संगीत विद्यालयात शास्त्रीय संगीत ,सुगम संगीत असे शिक्षण दिले जाते. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते.याशिवाय फक्त शास्त्रीय किंवा सुगम संगीत एवढंच मर्यादित शिक्षण न होता प्रत्येकाला सर्व गीतप्रकार आले पाहिजेत हा कटाक्ष मी पाळते. कारण सध्याचं युग हे स्पर्धात्मक जास्त आहे यांत टिकून रहायचे असेल तर तेवढच जागरूक राहणे गरजेचे आहे. यांसाठी मी आमच्या विद्यालयात ""सर्टिफिकेट कोर्स"" सुरू केला. कांही विशिष्ट "राग" आणि "ताल " याबरोबरच सुगम संगीतातील सर्व गितप्रकार म्हणजे अभंग ,नाट्यगीते ,भावगीते ,मराठी ,हिंदी चित्रपट गीते इत्यादी चा समावेश आहे यांशिवाय "गीतरामायण" हा आपला सगळ्यांचा आणि विशेषतः माझ्या वडिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून गीतरामायणातील गीतांचा ही समावेश केला. या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला .यालाही 10 वर्षे झाली.
या विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा मध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत ,स्वतंत्र गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत याचा मनस्वी आनंद आणि समाधान मिळते आहे । मी दरवर्षी गुरुपौर्णिमा कार्यक्रमात काहीतरी वेगळेपण श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करते ।गीतरामायणातील निवडक 30 गीतांचे सादरीकरण 5 तास करून विद्यार्थ्यांनी रसिकांना मनसोक्त आनंद दिला । माझे गुरू जेष्ठ संगीतकार "राम कदम यांच्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करून एका गुरुपौर्णिमेला रामभाऊंना स्वरांजली अर्पण केली .यांत ३५ जणांनी सहभाग घेतला होता. माझ्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि आईला ही संगीता बरोबर च कीर्तनाची ही खूप आवड होती म्हणून त्यांच्या नावे " गांधर्व विद्यालयाच्या परीक्षेत ,"श्रीनिवास संगीत विद्यालयातून पहिल्या आणि दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आईवडिलांच्या नावाने ट्रॉफीज देऊन गौरविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती काळांत ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. श्रीनिवास संगीत विद्यालयाचे यू ट्यूब चॅनल सुरू करून कुठे ही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले नाही. सामाजिक बांधिलकी च्या नात्याने कांही उपक्रम राबविण्यात येतात. बाबा आमटे यांच्या संस्थेला कांही रक्कम देऊन ही पायवाट निर्माण केली. संतश्रेष्ठ शेगांव निवासी श्री गजानन महाराज यांच्या अध्यायावर आधारित गाण्यांचे सादरीकरण शेगांव च्या मंदिरात करण्याचे भाग्य आम्हांला लाभले. श्री क्षेत्र आळंदी येथील मंदिरात ही आमच्या विद्यार्थिनींना भक्तीसुमने अर्पण करण्याची संधी मिळाली.
गेल्या पंचवीस वर्षात अनेक मान्यवरांनी आमच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शाबासकी दिली आणि विद्यालयात चालणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले आहे .यांसाठी पुण्यातील सर्व निष्णात वादकांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे . विद्यालयातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी स्वतंत्र कार्यक्रम सादर करून जनमानसात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत ही "श्रीनिवास संगीत विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे . जयश्री कुलकर्णी , श्रीनिवास संगीत विद्यालय ,पुणे

No comments:

Post a Comment