Saturday, September 10, 2011

काही नविन रचना

रुसलेले शब्द

माझेच शब्द आज मला वाटतात अनोळखी
भावनाही त्यांच्यातल्या ना दाखविती आपुलकी..

शब्दांनाही त्या मी जन्म दिला कवितेसाठी
प्रिय होते, जवळीक त्यांची माझ्यासाठी..

शब्दांची गुंफून फुले मी कितीकदा माळली
गंध घेतला ज्यांनी त्यांना ती आवडली..

भावना कोणतीही असो शब्द मला सापडले
कोणत्याही क्षणी मला ना ते परके वाटले...

आज भावना माझ्या मनात असती
शब्द का न येती भावनेत भिजुनी..

शब्द कधी ना रागावती प्रतिभेची साथ असता
कवितांनाही बहर येतो बाहेर वसंत नसता..

शब्दांवर प्रेम माझे, शब्द माझे सोबती
येतील पुन्हा जरी रुसले माझ्यावरती


श्रीकांत आफळे, पुणे

भेट विठ्ठलाची



विठ्ठलाच्या भेटीसाठी
जीव आसुसला
वारकरी टाळमृदंगाच्या
गजरात पायी हा चालला..
मनी एक आस
विठ्ठल भेटावा
डोळे भरूनी त्याला
एकदा पहावा...
तहानभुक हरते
पायी चालताना
जीवनाचे सार्थक होते
नाव घेताना..
ओठात अभंग
किर्तनी दंग
चालली वारी
कधी पावसाचा संग...
विठू माझा भक्तांसाठी
उभा विटेवरी
नाम गजरात
दुमदुमे ही पंढरी..
चंद्रभागेमध्ये
करुनिया स्नान
विठोबाचे दर्शन
देई समाधान..
भक्तांचा सोहळा
भक्तित न्हाहला
ह्दयाचा विठ्ठल
आनंदुनी गेला...


श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

shrikantmaitreya@gmail.com

Friday, September 9, 2011

पेशवाईत गणेश उत्सव


दररोज शिजणारा तीनशे किलो तांदूळ-गहू..., पाच दिवसांच्या उत्सवावर तब्बल ७० हजार रुपये खर्च... अन् मातीसह सोन्याच्या मूर्तीची गणेशस्थापना... अशा श्रीमंती थाटात पेशवाईत गणेश उत्सव साजरा होत असल्याचे पेशवे दफ्तरातील कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहे. पुण्यातील इतिहास अभ्यासक-संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शोधलेल्या पेशवाईतील ५० वर्षांच्या जमा-खर्चातून पेशवे गणेशोत्सवातील भव्यता समोर आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळकांनी रोवली असली, तरी पेशवाईत शनिवारवाड्यावर गणपती उत्सव मोठ्या थाटा-माटात साजरा केला जायचा. त्या संदर्भात मोडी लिपीत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास बलकवडे यांनी केला आहे. त्यातून उत्सवावर होणारा खर्चच नाही, तर त्याची भव्यताही उजेडात आली आहे.

' शनिवारवाड्याच्या गणेश महालातील सोन्याच्या गणपतीपुढे मातीच्या उत्सवमूर्तीची स्थापना केली जायची. त्यासाठी भव्य मखराची निर्मिती होत असे. पूजा-अर्चा, व्रतवैकल्ये, मंत्रपठण यासारख्या धार्मिक विधींसाठी रात्रंदिवस २१ ब्राह्माणांची नेमणूक केली जात असे. त्याशिवाय, कीर्तनकार, प्रवचनकार, हरदास हेदेखील देवापुढे सेवा सादर करत,' असे बलकवडे यांनी सांगितले.

विविध जाती-धर्माचे देशभरातील नावाजलेले कलावंत सादरीकरणासाठी आवर्जून या उत्सवात सहभागी होत असल्याचेही या कागदांवरून निदर्शनास येते, असेही बलकवडे यांनी स्पष्ट केले.
................

खर्च ७० हजारांहून अधिक

' पाच दिवसांच्या या उत्सव काळात दररोज दोन्ही वेळेस हजारो लोकांना पंचपक्वांन्नांचे भोजन प्रसाद म्हणून दिले जात असे. त्यासाठी दिवसाला तीनशे किलो याप्रमाणे पाच दिवसांत १५ पोती गहू-तांदूळ शिजवला जात असे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या पाच दिवसांच्या उत्सवासाठी तब्बल ७० हजार रुपयांहून अधिक खर्च व्हायचा,' अशी त्याची भव्यताही बलकवडे यांनी कथन केली.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9901649.cms