Thursday, May 5, 2011

'कथाकथनातून समाजसेवा'


केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...


पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!

गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.

कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.

पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.

साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.

२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.

मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.

No comments:

Post a Comment