Thursday, May 5, 2011

मराठी लावणी पोरकी झाली ...
मराठीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. मुत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खेबूडकरांच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपट विश्वावार शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. आज सकाळी कोल्हापूरमधील आधार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खेबुडकरांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याच्या गीतामुळे अनेक चित्रपट अजराअमर झाले आहेत. लावण्या हा जगदीश खेबुडकरांनी मराठी चित्रपटाला दिलेले एक मोठे योगदान म्हणावे लागेल. ज्या काळी मराठी चित्रपट केवळ अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चित्रपट गाजत असे. त्या काळात खेबुडकर यांनी स्वतःच्या गीताने चित्रपट अजराअमर केले. खेबुडकर यांनी ३५० चित्रपटांमधून तब्बल पावनेतीन हजार गाणी लिहली आहेत.

पिंजरा,साधी माणसं आणि समाना अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

तुम्हावर केली मी...,राजा ललकारी...,कुठं कुठं जायचं हनिमूनला..., देवा तुझ्या दारी आलो...,ऐरणीच्या देवा तुला..., मला हो म्हणतात लवगी मिरची..., आकाशी झेप घे रे..., कोण होतीस तू... काय झालीस तू...; अशी त्यांची असंख्य गाणी रसिकांच्या होठावर आजही कायम आहेत.

खेबुडकरांच्या निधनामुळे मराठी चित्रपटात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

जगदीश खेबुडकर यांच्यावर केलेली कविता ... जीवनगाणे

बहरुनी पुष्पात साऱ्या , गंध माझा वेगळा
लहरुनी छंदात साऱ्या, छंद माझा वेगळा
सूख म्हणती ज्यास ते
ते सर्व काही भोगले
दुःख आले जे समोरी
सोसुनी ना संपले
अंत नाही ज्यास, ऐसा खेळ आहे मांडला
वाट पुढची चालताना
सोबती सारे असे
उतरणीला वळण येता
संगती मम सखि नसे
क्लेष मनिचे लपवण्या, हा मुखवटा मी ओढला
दान द्यावे ज्ञान घ्यावे
जीवनाचे मर्म हे
काव्यरुपी दान देता
तृप्त झाले कर्म हे
दुखाविलेल्या लोचनांनी, पाहतो सुख सोहळा

- कविता खेबुडकर (अमृता पाड़ळीकर)

(ही कविता जगदीश खेबुडकर यांच्या कन्या कविता खेबुडकर यांनी केलेली आहे ).

No comments:

Post a Comment