Monday, September 30, 2024

धमाल अनुभव ..स्थळ आले धावून..!

गिरीश ओक आणि संजय मोने या जोडीने पौर्णिमा तळवलकर यांच्या सोबत रंगभूमीवर दिलेला धमाल अनुभव
बरेच दिवसांनी उभयतां भरपूर हसलो..मार्मिक .. विनोद..निखळ मनोरंजन..आणि नाटकातील सहज घडणारी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवून खूप समाधान वाटले.. निवृत्त झालेल्या शिक्षकाला ( संजय मोने )जोडीदार हवा असतो..तो मिळावा यासाठी त्याने आपले नाव एका विवाह संस्थेत नोंदवितो.. लांबून पाहिलेली एका कीर्तनकार बाई ( पौर्णिमा तळवलकर )आपली व्हावी याचा ध्यास घेतो..तिच्याशी मनातून प्रामाणिकपणे प्रेम करतो..तिच्याशी लग्न करण्याची स्वप्ने पहात असतो.. त्यासाठी ती विवाह संस्थेत नाव नोंदवितो.. पण विवाह संस्थेचा चालक ( गिरीश ओक )हे बंध जुळविण्याच्या प्रयत्नात तोच तिच्या प्रेमात पडतो...यातून एकाची निवड करण्यासाठी विविध मार्गातून नेमका निर्णय काय होतो..आणि अखेरीस ही रेस कोण जिंकतो..ह्याची उत्तरे नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला मिळतील.
एका अर्थाने हा प्रेमाचा त्रिकोण.. यात मात्र ज्याला जे हवे असते तेच अखेरीस प्राप्त होते हे विशेष. एकाकी असलेल्या दोन ज्येष्ठ स्त्री..पुरुषांना..आपल्या एकाकी जीवनात जोडीदार हवा असतो..मग ती सहसुलभ भावना तरुण पणी जशी जपावी तशी तयार होणे स्वाभाविक ..ही प्रेमकहाणी पाहताना तुम्ही त्यात सहज गुंगून जात त्याचा मनमुराद आस्वाद घेता. 




डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी आपल्या सहसुलभ ..खुसखुशीत संवादातून आणि त्यांच्या परिपक्व देहबोलीतून असे काही बेमालूमपणे नटवितात की त्यातून ते रसिकांना दोन तास हास्यरसाचा आनंद देतात. 








शरदचंद्र रामचंद्र चंद्रात्रे.. झकपक..स्मार्ट आणि बेरक्या..मिश्किल..तर दुसरा सुभाष शांताराम फडतरे.. आदर्श शिक्षक..सत्यावर विश्वास ठेवणारा, वरवर गबाळा.. पैशापेक्षा प्रेमाशी प्रामाणिक असलेला माणूस. संजय मोने राधाकृष्णन् बनून श्रावणी याचेवर आपली छाप पडावी यासाठी घडविलेला अफलातून प्रसंग फारच उत्तम साकारला गेला आहे.. त्यात गिरीश ओक त्यांना..अतिक्रमण विभागाचे अधिकारी..आणि गुंडांशी सामना करणारा रजनीकांत..बनवून हे काही दर्शन घडविले आहे..ते पाहताना रसिक हासून हासून बेजार होतात.. आणि शेवटी श्रीकृष्णाच्या मंदिरात श्रावणी कुणाच्या गळ्यात वरमाला 
घालणार ..ती उत्सुकता वाढविणारा प्रसंग ज्या काही पद्धतीने रांगवितात त्याला दाद द्यायला हवी. 






पूर्णिमा तळवलकर यांनी तेव्हढीच तयारीने उभी केलेली श्रावणी मेहेंदळे यांची ..व्यक्तिरेखा तुम्हाला सहज सुंदर भासेल. किर्तनकाराच्या भूमिकेत त्या शोभतात.. ठसका..प्रेम.. आणि उत्सुकता सारेच त्यांच्या अभिनयातून व्यक्त होते.

उत्तम नेपथ्य ( तिसऱ्या आंकातील भव्य आणि सुदंर कृष्ण मंदिर ), परिणामकारक प्रकाशयोजना, साजेसे पार्श्वसंगित..साऱ्यातून नाटक मनात घर करते.. हेमंत एदलाबादकर यांनी पहिल्या अंकात हास्य फुलविले..तर दुसरा अंक थोडा गंभीर करून.. नाटकातली रहस्य..आणि पुढे काय होईल ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवली आहे. 





समाजातील एका वेगळा विषय.. ज्येष्ठ असलेल्या..पण लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांचा प्रश्न नाटकाच्या माध्यमातून हळुवार प्रेमकहाणीतून नाटकातून अधोरिखित केला आहे. ते जेव्हढे लेखक म्हणून
मनात ठसतात तसे ते दिग्दर्शक म्हणूनही आपली कमाल दाखवितात.. रंगभूमीवर नाटक कसे दिसावे आणि ते सतत हालते राहून ते रसिकांच्या मनात कसे उतरेल याची काळजी त्यानी घेतली आहे. मंगल विजय केंकरे यांची ही निर्मिती पाहताना उत्तम विनोदी नाटक रंगभूमीवर पाहिल्याचे समाधान मिळते. स्थळ आले धावून..हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी आवर्जून जावे..आणि सहज विनोद..आणि कलावंतांनी साकारलेल्या भूमिका..पाहून दाद द्यावी..! 





- subhash inamdar, Pune.

 subhashinamdar@gmail.com

Sunday, September 22, 2024

३८ कृष्ण व्हिला.. खिळवून ठेवणारा अनुभव .. !

मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल.. देवदत्त कामत आणि नंदिनी मोहन चित्रे या दोन व्यक्तिरेखा तुम्हाला सव्वादोन तास त्या रंगवकाशात जखडून ठेवतात..आणि त्यातूनच ते एक खिळवून ठेवणारा खेळ थोडेही विचलित न होता तो पाहायला लाऊन त्यात गुंतवून ठेवतात..तुम्ही सम्मोहित झाल्यासारखे होता... होय..ही किमया दोन सशक्त पत्रांच्या म्हणजे डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे ..३८ कृष्ण व्हिला..या नाटकातून घडवितात..हे सत्य वास्तव आहे.. नाटक सुरू होते ते ..नंदिनी मोहन चित्रे यांच्या आगमनाने लेखकाच्या घरात.. कारण त्याने आपल्या पुस्तकाला मिळालेला साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार घ्यायला जावू नये..यासाठी तिने दिलेल्या नोटीस करणावरून.. तिच्या मते हे लेखन त्याचे स्वतः चे नसून आपला नवरा मोहन चित्रे याचे आहे.. यावरून.. पहिला अंक देवदत्त कामत नंदिनीला हे लेखन कसे आपले आहे हे समजावून सांगण्याच्या गोष्टीत.. तर दुसरा अंक सारा घडतो..ते मोहन चित्रे याने त्याने लिहलेले लेखन कसे आपल्या नावाने प्रसिद्ध केले हे सांगणारा याबद्दल .. दोन परस्पर भिन्न घटना..आणि त्या केवळ उत्कट अशा भावस्पर्शी संवादातून..आणि दोन नटांच्या परस्पर भिन्न अशा व्यक्तिरेखेतून.. पहिल्या अंकात ती अती भावनिक..संवेदनशील..हळवी..रडवेली..तर तो आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत आपणच कसे योग्य आहे हे सांगण्याच्या स्थितीत.. केवळ दोन पात्रे असलेले नाटक.. घटनेतून नव्हे तर शब्दातून पुढे जाणारे.. उत्कंठा वाढविणारे एकेक पाऊल रंगभूमीवर पडत असताना ते सारे खरे म्हणून त्या व्यक्तीरेखे बरोबर वाहवत जातो.. त्याचे कारण एकच डॉ. गिरीश ओक..यांचा दमदार वावर..सहज केलेला अभिनय..आणि उत्तम वाक्यमांडणी... याउलट नंदिनी बनून नाटकाची लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी उभी केलेली संवेदनशील मनाची..हळवी..पण प्रसंगी कठोर असलेली तेव्हढीच तयारीने उभी केलेली व्यक्तिरेखा...यामुळे.. आणि हो..यातले मोहन चित्रे हे पात्र प्रत्यक्ष दिसत नाही पण त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे व्यक्तित्व..सतत जाणवते कारण ते पात्र नाटकभर आपल्या मनात कायम रहाते. एक बंदिस्त आणि रसिकांना खिळवून ठवणारा प्रयोग बांधणारे दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या उत्तम दिग्दर्शन कौशल्यामुळे हे नाटक अधिक अंगावर येते.. मराठी रंगभूमीवर एक वेगळा विषय आणि त्याची अशी उत्तम मांडणी झाल्यामुळे मराठी रंगभूमीवरील एक उत्तम नाटक या श्रेणीत ३८ कृष्ण व्हिला ..नक्कीच समाविष्ट केले जाईल.. असा वेगळा विषय अतिशय उत्तम रित्या मांडण्याचे धाडस केलेल्या डॉ. श्वेता पेंडसे यांचे नाटककार म्हणून रसिकांनी स्वीकारलेले हे नाटक त्यांच्याकडून अधिक चांगल्या विषयावरील..आणि मराठी रंगभूमी अधिक श्रीमंत करणारी कलाकृती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.. १९ मार्च २०२२ रोजी रंगभूमीवर आलेले हे नाटक पाहण्यासाठी आम्हाला २३५ प्रयोग वाट पहावी लागली याची खंत आहे.. पण दरसे आये..दुरुस्त आये..अशीच भावना आहे.. नाटक संपल्यावर इतके उत्तम , बंदिस्त ..आणि लेखन तसेच दोघांची कामेही अतिशय सुंदर असल्याचे रसिकांच्याकडून व्यक्त होत होते.. हीच तर नाटकाची खरी पावती आहे.. ज्यांनी अजून पाहिले नाही त्यानी आवर्जून हे नाटक पहावे ..! श्रेयनामावली लेखक: डॉ. श्वेता पेंडसे दिग्दर्शक: विजय केंकरे नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: अजित परब
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com