Wednesday, January 4, 2012

पुरस्काराचे मोल..अनमोल...

पहिल्या पुरस्काराचे मोल..अनमोल...
गेली ३२ वर्षे मी व्हायोलिन वादक म्हणून विविध कार्यक्रम अनेक संस्थांमधून केले. व्हायोलिनची साथ करताना जो आनंद घेतला तो समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेह-यावर मी अनेकविध पध्दतीने अनुभवला. माझे वडिल आणि गुरु पं. भालचंद्र देव यांच्या बरोबर स्वतंत्र व्हायोलिन वादनाच्या अनेक मैफलीही केल्य़ा. काही ठिकाणी मीही स्वतंत्र व्हायोलिन वादनाचा कार्यक्रमही सादर केला. मात्र आज इतक्या वर्षानंतर का होईना पहिला पुरस्कार मिळाला. माझ्यालेखी त्याचे मोल अनमोल आहे.


देशस्थ ऋग्वेदी व्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे यंदाचा डॉ. गजानन रमाकांत एकबोटे यांनी ठेवलेल्य़ा ठेवीच्या व्याजातून मिळालेला `संगीत सेवे`साठी पुरस्कार मला जाहिर झाला. तो पुरस्कार ८ जानेवारी २०१२ ला मुक्तांगणच्या पुणे विद्यार्थीगृहाच्या सभागृहात ( अरण्येश्वर रस्ता, पुणे- ९) समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.


या निमित्ताने माझ्या मनात आलेल्या भावनेला शब्दबध्द करुन मी यातून वाट करुन देत आहे. आपण माझी व्हायोलिनसेवा अनुभवली आहेच..ही शब्दसेवाही गोड मानून मला यापुढच्या वाटचालीस आशिर्वाद द्याल अशी खात्री आहे.

--------------------------------------------------


गेली तीसपेक्षा अधिक वर्षे मी संगीत क्षेत्रात व्हायोलिन वादनाच्या रुपाने आपली सेवा रसिकांसमोर सादर करीत आहे. रसिकांचा भरभरुन प्रतिसाद माझ्या विविध कार्यक्रमांना मिळतो आहे ,
आजही मला आपल्यासारखे दर्दी श्रोते समोर दिसत आहेत.

कलाकार हा रसिकांच्या पावतीचा भुकेला असतो. मूठभर काळजामध्ये ढीगभर स्वप्न बाळगून माणूस जगत असतो आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धावत असतो. पण कलाकाराचे मात्र एकच स्वप्न असते. ते म्हणजे आपल्या कष्टाचं कधीतरी चीज व्हावं. ते स्वप्न जेव्हा अशा संस्थांकडून पुरस्काराच्या रुपाने पूर्ण होतं. तो कलाकाराचा खरा आनंद असतो.
आज मला `संगीतसेवा` या नावाने जो पुरस्कार मिळाला आहे, त्याचा खरचं मला खूप आनंद झाला आहे.

कोणताही कलाकार हा आयुष्यभर संगीताची सेवाच करीत असतो. आणि संगीतसेवा म्हणजेच ईश्वरसेवा.
ईश्वरसेवा झाली की आशिर्वाद सतत आपल्या मस्तकी असतो. त्या आशीर्वादाच्या बळावर आणि रसिकांच्या प्रेमावरच
कलावंत यशस्वी होतो. त्याला पुढच्या वाटचालीसाटी बळ मिळते.

असं म्हणतात की, परमेश्वर दर दिवशी एका ठराविक वेळी अमृतकणाची एक ओंजळ पृथ्वीवर टाकतो. ते अमृतकण ज्यांच्या हातावर पडतात ते वादक होतात. ज्यांच्या पायावर पडतात ते नर्तक होतात. ज्यांच्या वाणीवर पडतात ते चांगले किर्तनकार होतात, सूत्रसंचालक होतात आणि ज्यांच्या मनावर पडतात ते असे देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तॉजक संस्थेसारखे दुस-याचे कौतूक करणारे, पुरस्कार प्रदान करणारे मोठ्या मनाचे लोक असतात.

या पुरस्कारासाठी माझी निवड केलेल्या निवड समितीच्या मंडळींचे आणि संस्थेच्या सा-या पदाधिका-यांची..विशेषतः श्री. शंकर दामोदरे यांची मी आभारी आहे.

माझ्याकडून आयुष्यभर अशीच संगीत सेवा होवो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करते.






सौ.चारुशीला गोसावी, पुणे.
charusheelagosavi@gmail.com
9421019499

1 comment:

  1. Dear Charusheela you are great. Wishing you very bright future in music. I always admire you and your violin. Ashok Khare.

    ReplyDelete