Tuesday, September 30, 2025

एका अमर लेखाची दीडशेवी वर्षपूर्ती..!


'वन्दे मातरम् ' आणि नवरात्रीचा संबंध खूप जवळचा आहे . ' वन्दे मातरम् ' चा जन्म बंकिमचंद्रांच्या अलौकिक प्रतिभेतून हे गीत कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी जन्माला आले . हे वर्ष 'वन्दे मातरम् ' च्या निर्मितीचे १५० वे वर्ष आहे . 'वन्दे मातरम् ' च्या जन्माआधी अश्विन शुद्ध अष्टमी - नवमी च्या रात्री बंकिमचंद्रांनी ' आमार दुर्गोत्सव ' हा लेख लिहिला . हा लेख म्हणजे 'वन्दे मातरम् ' च्या जन्माच्या बरोबर एक महिना आधी लिहिलेले 'वन्दे मातरम् ' चे गद्य रूप . आज अश्विन शुद्ध अष्टमीला या क्रांतिकारक लेखाच्या लेखनाला १५० वर्षे होत आहेत .

बंकिमचंद्र डेप्युटी मॅजिस्ट्रेट पदावर काम करत होते . ते आणि त्यांचे तीन बंधू नोकरीच्या निमित्ताने कुठेही असले तरी घरच्या नवरात्राच्या उत्सवासाठी ते आपल्या जन्मगावी नैहाटी कांटालपाडा येथे येत असत . तिथे वयोवृद्ध वडील यादोबचंद्र मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करीत . आजूबाजूच्या अनेक गावातील लोकं या उत्सवाला येत . १८७५ च्या नवरात्रोत्सवालाही बंकिमचंद्र नैहाटीला आले होते . अष्टमीच्या उत्तररात्री नवमीच्या पहाटे बंकिमचंद्र देवीसमोर एकटेच एका खांबाला टेकून उभे होते . भाऊ पूर्णचंद्र यांच्या बरोबर देवीच्या स्वरूपाबद्दल ते बोलत होते . अशा वेळी त्यांना त्या देवीच्या स्वरूपात जणू भारतमाता दिसू लागली . तिच्या पायाखाली असलेला महिषासूर इंग्रजी सत्तेचे प्रतिक वाटू लागले . या लेखाचा नायक कमलाकांत हे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील त्यांचे काल्पनिक पण विद्वान एककल्ली असे पात्र . बंकिमचंद्रांनी हा लेख कमलाकांत सांगतो आहे असा लिहिला . नदीकाठी बसलेल्या कमलाकांतला सूर्योदया बरोबर नदीच्या पात्रामधे सुवर्णमयी शारदीय प्रतिमेचे दर्शन होते . आता तिचे पूजन करणार तेवढयात ती नदीपात्रात अंतर्धान पावते , त्यामुळे व्याकुळ झालेला कमलाकांत आई तू कुठे गेलीस ? अशी तिला साद घालतो . आणि आपल्या सहा कोटी भारतवासियांना आवाहन करतो ' कालसमुद्रात अंतर्धान पावलेल्या मातृभूमीच्या त्या सुवर्णमयी प्रतिमेला आपण सर्व मिळून त्या कालसमुद्रात उडी घेऊन बाहेर काढू यात . सर्व वाद्यें वाजवून तिची पूजा करू यात . तिला आई म्हणून साद घालू यात .

बंकिमचंद्रांना जणू सुचवायचे होते की आपण भारतमातेला या कालसमुद्रातून म्हणजे पारतंत्र्यातून मुक्त करून तिला उच्च स्थानावर बसवूया . या लेखाचा शेवट 

जय जय जय जय जगद्धात्री ।

जय जय जय बंग जगद्धात्री ॥

या स्वतःच्याच संस्कृत गीताने करतात .

भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करू यात असे देशवासियांना आवाहन करणारा हा आलंकारिक भाषेत लिहिलेला अत्यंत नितांतसुंदर असा लेख आहे . लेखाची भाषा ओघवती आहे . या अत्यंत छोट्या लेखात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे . या लेखाची बीजे हा लेख लिहिण्याच्या तीन वर्षे पूर्वी घडलेल्या घटनेत आहेत .

बंकिमचंद्र त्यांच्या नैहाटी या गावाला लागून असलेल्या गंगेच्या पलीकडच्या तिरावरील चिचुडा या गावी विश्रांतीसाठी आले होते . नदीतीरावरील मित्राच्या घराच्या वऱ्हांड्यात नदीकडे पहात असताना त्यांना काव्य लिहावे असे वाटले . परंतु शब्द सुचेनात . ते अस्वस्थ झाले . त्याचवेळी नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या तोंडून त्यांनी एक लोकगीत ऐकले . " हे गंगामाते तुझ्यासाठी आम्ही आमचे सर्वस्वही अर्पण करू " अशा अर्थाचे ते गीत ऐकल्यावर बंकिमचंद्रांना 'वन्दे मातरम् ' हे शब्द सुचले . पण पुढचे गीत मात्र तीन वर्षांनी त्यांनी लिहिले .

चिचुडा येथील ही सत्य घटना त्यांनी 'आमार दुर्गोत्सव ' या लेखात कमलाकान्त या पात्राच्या रूपाने गुंफली .


हा लेख बंकिमचंद्रांच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे. केवळ 'वन्दे मातरम्'चे पूर्वस्वरूप एवढेच याचे महत्त्व नाही, तर त्याच्या अप्रतिम भाषावैशिष्ट्यांमध्ये आणि मातृभूमीला दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपमांमध्ये आहे. 'वन्दे मातरम्'मध्ये ‘दशप्रहरणधारिणी, कमलाकमलदलविहारिणी, वाणीविद्यादायिनी, बहुबलधारिणी, रिपुदलवारिणी' असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आलेले आहेत. असेच शब्द या लेखात आहेत. नवरागरंगिणी, नवलधारिणी, नवस्वप्नदर्शिनी, नगांकशोभिनी, धनधान्यदायिनी, असे शब्द आले आहेत. हे शब्द नऊ या आकड्याशी संबंधित आहेत . आपल्या संस्कृतीत नऊ या आकड्याला विशेष महत्त्व आहे . नऊ ग्रह , नवरत्ने, नऊ महिन्यानंतर  मातेच्या उदरातून होणारा अपत्याचा जन्म  ! बंकिमचंद्रांनी हा लेखही नवमीच्या दिवशी लिहिला आणि 'वन्दे मातरम् ' चा जन्मही नवमीच्या कार्तिक महिन्यात झाला .

या लेखातील इतर उपमा विशेषत:  सिंधुसेवी, सिंधुपूजित, सिंधुमंथनकारिणी, अनंतकालस्थायिनी हे शब्द दुर्गेपेक्षाही मातृभूमीचेच वर्णन करणारे आहेत. भाषासौंदर्याच्या दृष्टीने हा लेख म्हणजे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील चमत्कार आहे. बंकिमचंद्रांच्या अनेक कादंबऱ्यांमधील वर्णने उत्कंठावर्धक, वाचकांना खिळवून ठेवणारी, चमत्कृतिपूर्ण सिनेमॅटिक आहेत; तरीही या लेखाचा बाज त्यांच्या नेहमीच्या आजच्या भाषेत कादंबरीलेखनापेक्षा पूर्ण वेगळा आहे. बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या दीर्घ आहेत, घटनांची रेलचेल आहे. इथे मात्र लेख अगदी छोटा असतानाही, त्याचा आवाका पाहून इतक्या छोट्या प्रसंगातही बंकिमचंद्रांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले आहे . हा लेख वाचतांना अत्यंत सहजपणे वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग उठलेच पाहिजेत , हा बंकिमचंद्रांचा हेतू साध्य होतो .

' वन्दे मातरम् ' या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला १५० वर्ष पूर्ण होत असतांना त्यापूर्वी एक महिना आधी लिहिलेल्या या अजरामर लेखालाही आज १५० वर्षे होत आहेत . भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास घडवणाऱ्या 'वन्दे मातरम् ' चे मूळ गद्य स्वरूप असलेला हा लेख भारतीय साहित्यातील महत्त्वाचे पान आहे .


- मिलिंद प्रभाकर सबनीस

'वन्दे मातरम् ' चे अभ्यासक

फोन - ९४२२८८१७८३

ई मेल - sabnisvandemataram@gmail.com

No comments:

Post a Comment