Tuesday, September 30, 2025

एका अमर लेखाची दीडशेवी वर्षपूर्ती..!


'वन्दे मातरम् ' आणि नवरात्रीचा संबंध खूप जवळचा आहे . ' वन्दे मातरम् ' चा जन्म बंकिमचंद्रांच्या अलौकिक प्रतिभेतून हे गीत कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी जन्माला आले . हे वर्ष 'वन्दे मातरम् ' च्या निर्मितीचे १५० वे वर्ष आहे . 'वन्दे मातरम् ' च्या जन्माआधी अश्विन शुद्ध अष्टमी - नवमी च्या रात्री बंकिमचंद्रांनी ' आमार दुर्गोत्सव ' हा लेख लिहिला . हा लेख म्हणजे 'वन्दे मातरम् ' च्या जन्माच्या बरोबर एक महिना आधी लिहिलेले 'वन्दे मातरम् ' चे गद्य रूप . आज अश्विन शुद्ध अष्टमीला या क्रांतिकारक लेखाच्या लेखनाला १५० वर्षे होत आहेत .

बंकिमचंद्र डेप्युटी मॅजिस्ट्रेट पदावर काम करत होते . ते आणि त्यांचे तीन बंधू नोकरीच्या निमित्ताने कुठेही असले तरी घरच्या नवरात्राच्या उत्सवासाठी ते आपल्या जन्मगावी नैहाटी कांटालपाडा येथे येत असत . तिथे वयोवृद्ध वडील यादोबचंद्र मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करीत . आजूबाजूच्या अनेक गावातील लोकं या उत्सवाला येत . १८७५ च्या नवरात्रोत्सवालाही बंकिमचंद्र नैहाटीला आले होते . अष्टमीच्या उत्तररात्री नवमीच्या पहाटे बंकिमचंद्र देवीसमोर एकटेच एका खांबाला टेकून उभे होते . भाऊ पूर्णचंद्र यांच्या बरोबर देवीच्या स्वरूपाबद्दल ते बोलत होते . अशा वेळी त्यांना त्या देवीच्या स्वरूपात जणू भारतमाता दिसू लागली . तिच्या पायाखाली असलेला महिषासूर इंग्रजी सत्तेचे प्रतिक वाटू लागले . या लेखाचा नायक कमलाकांत हे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील त्यांचे काल्पनिक पण विद्वान एककल्ली असे पात्र . बंकिमचंद्रांनी हा लेख कमलाकांत सांगतो आहे असा लिहिला . नदीकाठी बसलेल्या कमलाकांतला सूर्योदया बरोबर नदीच्या पात्रामधे सुवर्णमयी शारदीय प्रतिमेचे दर्शन होते . आता तिचे पूजन करणार तेवढयात ती नदीपात्रात अंतर्धान पावते , त्यामुळे व्याकुळ झालेला कमलाकांत आई तू कुठे गेलीस ? अशी तिला साद घालतो . आणि आपल्या सहा कोटी भारतवासियांना आवाहन करतो ' कालसमुद्रात अंतर्धान पावलेल्या मातृभूमीच्या त्या सुवर्णमयी प्रतिमेला आपण सर्व मिळून त्या कालसमुद्रात उडी घेऊन बाहेर काढू यात . सर्व वाद्यें वाजवून तिची पूजा करू यात . तिला आई म्हणून साद घालू यात .

बंकिमचंद्रांना जणू सुचवायचे होते की आपण भारतमातेला या कालसमुद्रातून म्हणजे पारतंत्र्यातून मुक्त करून तिला उच्च स्थानावर बसवूया . या लेखाचा शेवट 

जय जय जय जय जगद्धात्री ।

जय जय जय बंग जगद्धात्री ॥

या स्वतःच्याच संस्कृत गीताने करतात .

भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करू यात असे देशवासियांना आवाहन करणारा हा आलंकारिक भाषेत लिहिलेला अत्यंत नितांतसुंदर असा लेख आहे . लेखाची भाषा ओघवती आहे . या अत्यंत छोट्या लेखात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे . या लेखाची बीजे हा लेख लिहिण्याच्या तीन वर्षे पूर्वी घडलेल्या घटनेत आहेत .

बंकिमचंद्र त्यांच्या नैहाटी या गावाला लागून असलेल्या गंगेच्या पलीकडच्या तिरावरील चिचुडा या गावी विश्रांतीसाठी आले होते . नदीतीरावरील मित्राच्या घराच्या वऱ्हांड्यात नदीकडे पहात असताना त्यांना काव्य लिहावे असे वाटले . परंतु शब्द सुचेनात . ते अस्वस्थ झाले . त्याचवेळी नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या तोंडून त्यांनी एक लोकगीत ऐकले . " हे गंगामाते तुझ्यासाठी आम्ही आमचे सर्वस्वही अर्पण करू " अशा अर्थाचे ते गीत ऐकल्यावर बंकिमचंद्रांना 'वन्दे मातरम् ' हे शब्द सुचले . पण पुढचे गीत मात्र तीन वर्षांनी त्यांनी लिहिले .

चिचुडा येथील ही सत्य घटना त्यांनी 'आमार दुर्गोत्सव ' या लेखात कमलाकान्त या पात्राच्या रूपाने गुंफली .


हा लेख बंकिमचंद्रांच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे. केवळ 'वन्दे मातरम्'चे पूर्वस्वरूप एवढेच याचे महत्त्व नाही, तर त्याच्या अप्रतिम भाषावैशिष्ट्यांमध्ये आणि मातृभूमीला दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपमांमध्ये आहे. 'वन्दे मातरम्'मध्ये ‘दशप्रहरणधारिणी, कमलाकमलदलविहारिणी, वाणीविद्यादायिनी, बहुबलधारिणी, रिपुदलवारिणी' असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आलेले आहेत. असेच शब्द या लेखात आहेत. नवरागरंगिणी, नवलधारिणी, नवस्वप्नदर्शिनी, नगांकशोभिनी, धनधान्यदायिनी, असे शब्द आले आहेत. हे शब्द नऊ या आकड्याशी संबंधित आहेत . आपल्या संस्कृतीत नऊ या आकड्याला विशेष महत्त्व आहे . नऊ ग्रह , नवरत्ने, नऊ महिन्यानंतर  मातेच्या उदरातून होणारा अपत्याचा जन्म  ! बंकिमचंद्रांनी हा लेखही नवमीच्या दिवशी लिहिला आणि 'वन्दे मातरम् ' चा जन्मही नवमीच्या कार्तिक महिन्यात झाला .

या लेखातील इतर उपमा विशेषत:  सिंधुसेवी, सिंधुपूजित, सिंधुमंथनकारिणी, अनंतकालस्थायिनी हे शब्द दुर्गेपेक्षाही मातृभूमीचेच वर्णन करणारे आहेत. भाषासौंदर्याच्या दृष्टीने हा लेख म्हणजे बंकिमचंद्रांच्या साहित्यातील चमत्कार आहे. बंकिमचंद्रांच्या अनेक कादंबऱ्यांमधील वर्णने उत्कंठावर्धक, वाचकांना खिळवून ठेवणारी, चमत्कृतिपूर्ण सिनेमॅटिक आहेत; तरीही या लेखाचा बाज त्यांच्या नेहमीच्या आजच्या भाषेत कादंबरीलेखनापेक्षा पूर्ण वेगळा आहे. बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या दीर्घ आहेत, घटनांची रेलचेल आहे. इथे मात्र लेख अगदी छोटा असतानाही, त्याचा आवाका पाहून इतक्या छोट्या प्रसंगातही बंकिमचंद्रांनी वाचकांना मंत्रमुग्ध केले आहे . हा लेख वाचतांना अत्यंत सहजपणे वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग उठलेच पाहिजेत , हा बंकिमचंद्रांचा हेतू साध्य होतो .

' वन्दे मातरम् ' या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला १५० वर्ष पूर्ण होत असतांना त्यापूर्वी एक महिना आधी लिहिलेल्या या अजरामर लेखालाही आज १५० वर्षे होत आहेत . भारतीय स्वातंत्रलढ्याचा इतिहास घडवणाऱ्या 'वन्दे मातरम् ' चे मूळ गद्य स्वरूप असलेला हा लेख भारतीय साहित्यातील महत्त्वाचे पान आहे .


- मिलिंद प्रभाकर सबनीस

'वन्दे मातरम् ' चे अभ्यासक

फोन - ९४२२८८१७८३

ई मेल - sabnisvandemataram@gmail.com

Saturday, August 16, 2025

मी कोण.. चा शोध घेणारा परिणामकारक मंचीय अनुभव कोSहम ..!

 



आजच्या आधुनिक सोशल माध्यमातून प्रत्येकजण सांगतोय..होय मी आहे..
हा मी नेमका कोण आहे.. तुम्ही जिथे कार्य करत
आहात तिथे मी चा शोध घ्या.. आपोआपच निंदनीय विचार सोडून वंदनीय होण्याकडे कल वाढेल ..
आपले अस्तित्व काय आहे..
याचा शोध घेताना काळाच्या उदरात ..इतिहासाच्या .. संत साहित्याछ्या पुस्तकाच्या दुनियेत दडलेल्या गोष्टी आणि आजचा काळ यांची सांगड घालत विराजस कुलकर्णी यांनी याची संहिता लिहिली आहे.
मी.. कोण आहे..याचा डोळसपणे विचार पुढे नेणारा हा एक नाट्यमयरित्या मंचीय दर्शन देणारा अनुभव..म्हणजेच कोSहम..
पुण्यात १५ ऑगस्टला या दोन अंकी नाट्यानुभवचा शुभारंभाचा प्रयोग पाहण्यात आला.. त्यानिमित्ताने हे टिपण करावेसे वाटले.



आजच्या इंटरनेटच्या काळात याच मी...चे महत्व असलेल्या तरुणाईला सहज वाचता वाचता त्याला तुकाराम महाराजांची ओवी वाचायला मिळाली..
रडोनियां मान ।
कोण मागतां भूषण
रडता रडता कौतुक मागून काय उपयोग
लावितां लावणी ।
विके भीके केज्या दानी ॥
अर्थ एव्हढाच स्वतः शेतात खपून पिकविलेले धान्य..आणि रस्त्यात भीक मागून गोळा केलेले गहू.. यात फरक आहे..
गो.नी दांडेकर .. आपले पणजोबा यांच्या मोगरा फुलला..संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर.. तुला आकाशा एवढा..ही तुकारामांच्या जीवनावर..आणि कादंबरीमय शिवकाल..ही शिवाजी महाराज यांच्यावरील जीवनावरील लिहिलेल्या संचातील घटना.. यातील निवडकभाग घेऊन त्याला काळाशी सुसंगत अशी जोडणी करून विराजस यांनी ..आयुष्याच्या अस्तित्वाचा विचार.. कोSहम यातून उतरविला.. सुमारे ३७५ वर्षापूर्वी संतानी आणि मोठ्या लोकोत्तर पुरुषांनी आपल्या आयुष्यात केलेल्या विचारांचा ..आणि आपण का आलो..आपले ध्येय काय..याचा घेतलेला हा शोध यानिमित्ताने पुन्हा तरुण रंगकर्मींना घ्यावासा वाटला..तो पट ..आजच्या आधुनिक काळातही किती महत्वाचा आहे..हेच यातून मांडण्याची ही दोन अंकात मंचीय दर्शन देणारी कलाकृती निर्माण केली..हे याचे महत्व अधिक आहे..



हे मऱ्हाठी भाषेचे त्या काळाचे संस्कार इथे एकत्र होऊन त्यातून ते अनुभव वाचले जातात.. गोष्टीत तो बाज..आणि साज चढवत अभिवाचन करणारे कसदार अभिनेते प्रसंग रसिकांच्या मनावर संस्कार करत..तो विचार व्यक्त करतात..हे याचे वैशिष्ट्य आहे.
याचे संकलन करताना मधुरा देव यांचा विचार असा होता.. कोs हम - संकल्पना म्हणून संत चरित्रात असंख्य ठिकाणी सापडते- जी आजच्या काळातही सर्वार्थाने लागू आहे आणि भविष्यात ही हे ‘शहाणपण’ उपयुक्त असणार आहे.
महाराष्ट्रात आणि मराठीत इतकं मोठं भांडार अनेक शतकांपासून उपलब्ध आहे त्याचा शहाणा वापर, जाणीवपूर्वक करता येईल; जेणेकरून जनमानस सुसह्य आणि आनंददायी जीवन मिळवू शकतील. संतवाड्मय आणि आप्पांच्या लेखनाचे आपल्याकडे उपलब्ध असलेले हे भांडार पुन्हा एकदा लोकाभिमुख आणावे हा विचार प्रामुख्याने होता.
आणि अर्थातच आप्पांच्या लेखनातले कोणते प्रसंग निवडावे इथे माझी मदत झाली.
आणि त्याची बांधाबांध विराजसने यथार्थ केली.. असे त्या सांगतात.




तोच नाट्यानुभव म्हणजे कोहम ही कलाकृती..
यात अभिवाचन आहेच..पण ते करताना ते कलावंत अभिनय साकारतात..वेशभूषा..संगीत.. यातून ..
त्याला जोडली गेली आहे ती नृत्यभाषा..
असा हा एक परिपूर्ण अनुभव देणारा प्रयोग नुकताच मुंबईत झाला..आणि आता पुण्यात होतो आहे.. ते प्रयोग आहे..आणि इथे कलाकार हातात वाचनाची पोथी घेत ते अनुभव परिपूर्ण रित्या. उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात..हे नक्कीच.
एके काळी ही तो श्रींची इच्छा..ही आप्पांची कादंबरी..वाचनासाठी घेऊन त्यातून अभिवाचन कसे असावे हे सांगणारे डॉ. वीणा देव.. डॉ. विजय देव..सोबत..मृणाल देव..कुलकर्णी आणि रुचिर कुलकर्णी यांचे हे रूप अनुभवले..
आणि आता इतक्या वर्षानंतर आपल्या पणजोबा यांची साहित्य कृती घेऊन त्याला अशा नव्या स्वरूपातील अभिवाचना द्वारे..नव्या स्वरूपात कार्यक्रम करण्याचे सुचणे..हीच तर एका पिढीची परंपरा पुढे नेण्याचे काम होत आहे. याचे
स्वागत करायलाच हवे.. इतके ते परिपूर्ण आहे.



आजच्या आधुनिक काळात मी पणाचा बडेजाव मिरविणाऱ्या युगात..अंतर्मुख करणारा ..विचार करायला लावणारा अनुभव देणारा हा नाट्यानुभव थिएटरॉन एंटरटेनमेंट ..यांनी दिला आहे..
या तरुण रंगमंच करणाऱ्या कलावंतांना हा विषय .. तोही संत ज्ञानेश्वर..तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ..यांच्या जीवनचरित्रातून घ्यावासा वाटावा हेच खूप मोलाचे आहे..



शिवानी रांगोळे.. शिवराज वायचळ आणि मृणाल कुलकर्णी..या तिन्ही कलावंतांनी. ती भाषा..त्यातील भावना.. ते प्रसंग रसिकांच्या मनावर आपल्या वाचिक आणि शारीरिक अभिनयातून बोलते केले असे म्हटले तर योग्य ठरेल..
आवश्यक तेव्हढीच..पण परिणामकारकता वाढविणारी मदत घेत फुलवा खामकर यांच्या नृत्य दिग्दर्शनातून हा मंचिय अनुभव अधिक उठावदार होत रहातो.



साजेसे अभंग..तो भक्तीचा भाव..निषाद गोलांबरे यांनी संगीतातून दिला आहे. याचे संकलन मधुरा देव यांचे आहे.
सुरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी आपल्या दिग्दर्शनातून कोSहम रसिकांना अनुभवण्यास अधिक परिणामकारक सादर केले आहे. प्रयोग मोहित करणारा होतो.



संकेत पारखे, विक्रांत पवार, साज जोशी, शताक्षी पंडित यांनी हा मंचीय अनुभव देण्यासाठी याथसार मदतच केली आहे.

- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Wednesday, April 16, 2025

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातील कार्यालयाचा उद्घाटन समारंभ


यापुढील काळात सर्व संमेलने ही साहित्यिकांना ब्रॅण्ड ॲम्बेसिडर करणारी असतील. हेच अधोरिखित करण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन माजी संमेलनाच्या अध्यक्षांनी करण्याचे ठरविले..संमेलनाची पूर्वीचं स्वरूप बदलण्याचे संकेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात सुरू झाले त्या प्रसंगी महामंडळाच्या नव्या अध्यक्षांनी दिले आहेत.
परिसंवादाचे स्वरूप बदलून त्याला चर्चा सत्राचे रूप देणे.. वक्त्यांची संख्या कमी करणे..साहित्य संमेलनाच्या साच्यात बदल करून वाचक केंद्रित संमेलने कशी होतील...याकडे अधिक लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिले आहे.
मंगळवारी १५ एप्रिल २५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते पुण्याचा मसापच्या सभागृहात साहित्य महामंडळाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले..त्यावेळी जोशी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बनहट्टी यांच्या बरोबर डॉ. अरुणा ढेरे, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या माजी संमेलनाध्यक्षांची उपस्थिती महत्वाची होती.
ग्रंथ प्रदर्शनाकडे गांभीर्याने बघावे लागेल.. समाजातल्या विविध विषयात काम करणाऱ्यांची सहविचार सभा घेऊन त्यांच्या कल्पना कशा अमलात आणता येतील.. संमेलन वाचक केंद्रित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील.. साहित्यातल्या सर्व प्रवाहांना सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल..संमेलना शिवाय अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न महामंडळ नक्की करेल असेही प्रा. जोशी यांनी आपल्या भाषणात सांगून महामंडळ विविध व्यक्तींशी आणि संस्थांशी संवादाचे पुल उभारण्यात पुढाकार घेईल ..आणि सर्वसमावेशक कार्य करेल असे ते म्हणाले.
यावेळी सदानंद मोरे, बनहट्टी, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे यांनीही महामंडळाला आणि संमेलनाविषयी अनेक सूचना मांडल्या..
प्रास्ताविक महामंडळाच्या नव्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी केले..तर महामंडळाचे नवे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आभार प्रश्न केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मृणालिनी कानेटकर यांनी केले होते..

Saturday, February 8, 2025

आनंदवन..७५ पूर्ण... तिसरी पिढी नव्या दृष्टीने नवी स्वप्ने घेत बाबा आमटे यांचे कार्य पुढे नेत आहेत..!

 






 शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही....

 

ह्या काव्यपंक्ती ज्यांनी रचल्या व प्रत्यक्षात तसे जगून दाखविले ते बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे, या उभयतांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात महारोगी सेवा समिती, वरोरा या स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने सुरू केलेल्या कार्ययज्ञास नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली!


या साडेसात दशकांच्या या लोकविलक्षण सेवाकार्याचे सिंहावलोकन आणि पुढील २५ वर्षांत योजित कार्याच्या दिशेची सुहृदांपुढे मांडणी या उद्देशाने “आनंदवन” इथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी“योगदानाचा–कृतज्ञतेचा–सद्भावनेचा–मित्रमेळावा” आयोजित केला होता.

त्यानिमित्त आनंदवन विषयीचे हे टिपण..!

 



समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन..!


आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे.  आज आनंदवन ही स्वतंत्र ग्रामपंचायत उभी आहे. या प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते.

आज ही महारोगी यांची रचनात्मक घडण करणारी जगातील एकमेव संस्था.. ७५ वर्षे पूर्ण करून आपला आदर्श निर्माण करीत आहे.



शरीराचा कुष्ठरोग मी बरा केला..पण मनाचा कुष्ठरोग मी बरा करू शकलो नाही..

सुदृढ मनाला जडलेला कुष्ठरोग अजून बरा झालेला नाही.. ज्या दिवशी तो बरा होईल त्या दिवशी आनंदवन सारखी चालविण्याची गरज पडणार नाही..

बाबा आमटे..


इतर आजाराप्रमाणे तुम्ही कुष्ठरोगी बरा झालेला असेल तर तुम्ही त्याला सन्मानाने, वाजत गाजत घरी घेऊन जा.. आणि समाजाला सांगा हा बरा झाला..मी आणतो..तुमच्यात वाढवा..पण ते होत नाही.. ही स्थिती बदलण्याची गरज आहे..असे डॉ. विकास आमटे सांगतात.


आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद.


आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे.


हाथ लगे निर्माण मे 

नहीं मारणे

नहीं मांगने..

बाबा आमटे यांच्या सांगण्यानुसार

त्याला असे उभे करा की तो मागू नाही शकला पाहिजे कुणाकडे..

असे आनंदवन  कुष्ठरोग्यांनी उभे केले..



आनंदवन इथे कुष्ठरोगी यांच्या निरनिराळ्या सहा वसाहती आहेत..त्यांच्यासाठी या मेगा किचनमध्ये स्वयंपाक होतो..तोही हेच लोक..स्त्रिया करतात.

इथे महाविद्यालय..शाळा आहेत त्यानाही इथे भोजनासाठी व्यवस्था इथे  करण्यात आली आहे..

त्यासाठी इंधन म्हणून पुण्याच्या किर्लोस्कर  यांच्या तंत्रज्ञान घेऊन बायो गॅसची निर्मिती  केली.  सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती करून त्यातून इथे ऊर्जा आणली गेली.

प्रत्यक्ष कुष्ठरोग्यांची वसाहत स्नेहसावली अनुभवताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आणि त्यानी नमस्कार..करून मलाही तुमचा माना..ही  डोळ्यातून केलेली विनवणी मन गलबलून सोडते..जे एकदा आले ते शेवटच्या श्वासापर्यंत..आनंदवनाच्या प्रवासाला येतात..हेच घर..हेच आयुष्य..!




 आज ५५ बेडचे हे हॉस्पिटल डॉ. पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली  इथे काम करीत आहे.

 डॉ. हृषीकेश गावंडे .. डॉ. कपिलदेव कदम हे इथे कसे काम चालते ते सांगतात..

आधुनिक उपचार पद्धती कुष्ठरोगी बांधवांसाठी इथे आहेत..




इथे केवळ कुष्ठरोगी नसून अपंग, मुक - बधीर मंडळींची संख्या असून कुष्ठरोगी बांधव कमी आहेत पण जे आहेत त्यांना त्यांचेकडे असलेले कौशल्य वाढवून त्या ज्या सेवा देतात त्याला मोबदला देऊन त्यास ताठपणे समाजात जगण्याचे बळ आनंदवन देत आहे..हे सर्वात महत्वाचे आहे..




डॉ. विकास तसेच डॉ. भारती..कौस्तुभ आमटे..डॉ. प्रकाश आणि डॉ . मंदाकिनी आमटे तसेच सारे आमटे कुटुंबीय..आपले विश्वस्त आणि निष्ठावान  कार्यकर्ते यांच्या बळावर इथली विकास स्वप्ने डोळस पणे पहात आहेत..

आनंदवन .. कुष्ठरोगी बांधवांसाठी जागतिक पातळीवर काम करणारी सर्वात संस्था आहे..समाजातील दानशूर आणि सामान्य माणूस त्यांच्या परीने संस्थे सोबत जोडला गेला आहे..पण शासनाचे याकडे पुरेसे लक्ष नाही..यानिमित्ताने का होईना..आनंदवन अधिक नव्या दिशेने कार्य करीत असल्याचे शासन पाहिल आणि आपली नजर इकडे वळवून त्यांना मदतीचा हात पुढे करतील .


- सुभाष इनामदार 

पुणे



Monday, January 27, 2025

भक्तीचा मळा आपल्या स्वर तालांनी फुलविणारा..पंढरीचा स्वामी..!



श्रुती विश्वकर्मा - मराठे आणि मेहेर परळीकर यांच्या स्वरांच्या आवर्तनातून तो भाव अतिशय उत्कटपणे रसिकांमध्ये पासरवितात.
इतकेच काय पण रचना संगीतबद्ध करताना जो देहभाव आपल्यात सामावून त्यातल्या काही रचना आशुतोष कुलकर्णी यांनी तन्मयतेने सादर करून जी दाद मिळविली तीही वाखाणण्यासारखी होती..
रचना तशा नव्या होत्या..लोकप्रिय नव्हत्या..पण त्यांचे हे तयारीचे मंचावरचे सादरीकरण विलक्षण आनंद देऊन जात होता..



सात्विक..सोज्वळ भव..शब्द स्वरातून इथे पाझरत होता..त्याचा गोडवा.. अधिक चाखावा असाच होता..
हा या प्रकारचा पहिलाच अनुभव होता. याचे अधिक प्रमाणात आणि विविध ठिकाणी सादरीकरण करण्याची आशुतोष कुलकर्णी यांची इच्छा आहे..
संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या भक्ती रचनांचा ..पंढरीचा स्वामी.. हा कार्यक्रम, रविवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी राजलक्ष्मी सभागृह, कोथरूड इथे रसिकांना श्रीमंत करून गेला. चोखंदळ श्रोते तिकीट काढून उपस्थित होते..
शब्दात भरून राहिलेला भाव मंचावर अधिक उठून दिसत होता.
पद्मश्री पं. उल्हासजी कशाळकर यांच्या सुरेल, दैवी आवाजात काही रचना त्यानी रचल्या हा आगळा योग जुळून आला.. याशिवाय पं शौनक अभिषेकी, पं रघुनंदन पणशीकर, बेला शेंडे, अतुल खांडेकर या गायकांनी गायलेल्या काही रचना या कार्यक्रमात नव्याने इथे तयारीने सादर झाल्या.



'सृजन परंपरा 'प्रस्तुत 'पंढरीचा स्वामी' या कार्यक्रमात आशुतोष कुलकर्णी यांनी आजपर्यंत संगीत दिलेल्या नव्या रचना..दोन तयारीच्या गायकांकडून नव्याने तेव्हढ्याच जोरकस पद्धतीने सादर करण्याचे धनुष्य इतके उत्तम पेलले की हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावा आणि त्यात तल्लीन होऊन जावे असा समोर आला.
भागीरथी मीसिंग..या आशुतोष कुलकर्णी यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील एक रचनाही रसिकांच्या पसंतीस उतरली..
कल्याण,बिलासखानी तोडी, गावती, मांड, जोगकंस, नंदभटियार असे विविध रागातील अभंगरचना अनुभवताना या संगीतकाराच्या संगीत नजरेला दाद द्यावीशी वाटते.



अभंगात पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांच्या विठ्ठल परणाला श्रोत्यांनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमातील भक्तीरचना अध्यात्मिक सत्पुरुष पू अरविंद आगाशेकाका तसेच डॉ संगीता गोडबोले, रेवा लिमये यांच्या इथे अतिशय मनापासून गायल्या गेल्याने उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात ऐकल्या.



मेहेर परळीकर (पं अजय चक्रवर्ती यांचे शिष्य), श्रुती विश्वकर्मा-मराठे (विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांची शिष्या) हे युवा पिढीतील आश्वासक गायक यांनी त्या अतिशय मनापासून आणि आपल्या गळ्यातून तो भाव प्रकट करत ..वाद्यांच्या तालावर स्वार होत त्या रचना पेश केल्या जात होत्या.
अथर्व कुलकर्णी, अनुप कोलथे, आदित्य आपटे, जगमित्र लिंगाडे आणि कृष्णा साळुंखे या वादक कलाकारांच्या साथीने ज्या ताला..स्वरात झाल्या ..त्यामुळे मूळ रचना अधिक मनापासून ऐकल्या गेल्या.



रचनेतील विविधता..त्यामागचा उद्देश..रचना कशा संगीतबद्ध झाल्या त्या आठवणी. अशा विविध टप्प्यात हा कार्यक्रम रंगत गेला..त्याचे अधिक कारण म्हणजे स्नेहल दामले यांचे शब्द सागरात नेण्याचे आणि त्यातून पुन्हा दुसऱ्या रचनेची निवेदनातून केलेली उत्तम गुंफण..
विवेक पाध्ये आणि सुलभा तेरणीकर यांच्या पुढाकाराने कोथरूड येथील राजलक्ष्मी मंच नव्या सादरीकरणासाठी नेहमीसारखा सज्ज होता.

- Subhash Inamdar,
Pune
subhashinamdar@gmail.com

Wednesday, November 6, 2024

डॉ. वीणा देव अतिशय संवेदशील व्यक्तीमत्व...!

 डॉ. वीणा देव यांनी गुणवत्तेशी आणि जीवनमूल्ये यांच्याशी कधीही तडजोड केली नाही.. प्रा. मिलिंद जोशी..

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वीणा देव.. यांची श्रद्धांजली सभा
मसाप सभागृह..५ नोव्हेंबर .२०२४







परिचयाचे वेगवेगळे परीख त्यांना काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जरी सहज मिळाले असले तरी डॉ. वीणा देव या नावामागची जी जादू होती ती त्यांना अखेपर्यंत मिळत गेली त्यामागे त्यांची साधना होती. सर्जनाच्या सर्व वाटा चोखाळल्या.
त्यांनी उत्तम ललित लेखन केेले..चरित्र लेखन केले. महत्वपूर्ण लेखन केले..संपादन केले. आणि अभिवाचनाच्या माध्यमातून त्यांनी जे साहित्य विश्वात जे योगदान दिले ते अत्यंत मोलाचे आहे..
उद्या जर साहित्यिक अभिवाचनाचा इतिहास लिहिला गेला त्यासाठी डॉ. वीणा देव यांचे पहिलं मानाचे पान असेल.
केवळ वाचिक सामर्थ्यावर कळस अध्याय गाठू शकतो याचा आदर्श वस्तुपाठच त्यानी घालून दिला.
व्यासंग आणि विद्यार्थी प्रिय असणे हा दुर्मिळ एक भाग्ययोग त्यांना लाभला होता.
साहित्य परिषद हे त्यांचे माहेरघर होते.
अतिशय संवेदशील व्यक्तीमत्व..त्यांनी गुणवत्तेशी आणि जीवनमूल्ये यांच्याशी कधीही तडजोड केली नाही..
सत्वशिल जगण्याचा आदर्श वस्तुपाठ देव दांपत्याने घालून दिला होता. आपल्या अटींवर जगणाऱ्यात विजय आणि वीणा देव यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
दुर्ग साहित्य संमेलन भरविण्याचा वेगळा उपक्रम करून एक अलक्षीत विषयाकडे समाजाचे लक्ष वेधले .
सर्व क्षेत्रातल्या..सर्व वयोगटातील लोकांशी मैत्र कसे जपावे याचे उदाहरण त्यानी घालून दिले..
सभेचे अध्यक्ष मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी..





ज्येष्ठ साहित्यीक भारत सासणे..
त्यांनी केलेला अभिवाचन हा प्रकार समाजात..सर्वदूर पोचविला..समाजाला जीवाचा कान करून कसे ऐकायचे त्याचे संस्कार त्यांनी केले.
गोनिदांचे साहित्य आणखी पुढे नेण्याचे कार्य त्यांनी मृण्मयी प्रकाशन माध्यमातून नेटाने केले.




मृणाल देव - कुलकर्णी..
अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा..
थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा..
तो दीड दिवसाचा पॅच होता.. आणि जाणवत होते की हे आता होऊन जावे सारे..
एक अत्यंत समृध्द आयुष्य ती जगली.. आप्पांनी अतिशय तिच्यावर प्रेम केलं..
लाख मोलाचे संस्कार केले..साहित्यिक, सांगेतिक , माणसे जोडण्याचे .माणसे जपण्याचे संस्कार. ..आणि जे जे आपल्याकडे आहे ते देऊन टाकण्याचा संस्कार तिच्यावर झाला..
आदर्श साहचर्य म्हणजे काय त्याचे उदाहरण माझ्या आई..वडिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
वडिलांनी जे उत्तम साहित्य निर्माण केले ते ध्यास म्हणून पुढच्या पिढीपर्यंत तिने पोचविले..त्याला लोकांनी उत्तम साथ दिली.
निरलसपणा..लोभसपणा तिच्यात होता..देण्याचे संस्कार तिने केले.. ते देणे पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले काम आहे..




मधुरा देव...
मुलांच्या पोटात सकस अन्न जावं आणि मुलं सुदृढ व्हावीत अशी आईची इच्छा असते. ...तसा तिने अतिशय आग्रहाने ..हट्टाने आमच्या कानावर, डोळ्यावर, मनावर उत्तम संस्कार होतील असे संगीत.. असं साहित्य , असेच विचार आमच्यावर बिंबवले..
सगळे साजरे करा..प्रत्येक गोष्टीत आनंद घ्या.हेच तिचे सांगणे असे.




वि.दा. पिंगळे..
गो नी दांची समृध्द साहित्य परंपरा..उत्तम जपली.. ज्यांचे जगणे आणि वागणे अजरामर असते त्यात वीणा देव या होत्या.
प्रा. प्रकाश भोंडे..
स्वरानंद..यशवंत देव.. साहित्य, संगीत क्षेत्रात..
कार्यक्रमात सहभाग वीणा देव यांनी घेतल्याच्या आठवणी..आजही कायम आहेत..
संजय नहार..
गोनिदा.. वीणा देव... या आजोबा.. मुलगी आणि देव कुटुंबीयांनी जपलेली समृद्ध साहित्य परंपरा शेकडो वर्षे जिवंत ठेवणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल..
सुभाष इनामदार..
शिक्षण,संगीत, साहित्य, नाट्य, उत्तम अभिवाचक, संवादातून रंगभूमीवर व्यक्त होणाऱ्या उत्तम रंगकर्मी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका..या सर्वात त्यानी समाजमनावर आपला ठसा उमटविला होता.
श्याम भुर्के...
त्यांची खरी पुस्तके ही आप्पा आणि निराताई.. ( आई)..हीच होती.. ते साहित्य संस्कार आणि गुण वीणा देव यांच्याकडे आले. दुर्ग साहित्य संमेलन भरविण्यात पुढाकार..
त्यांच्याकडून सर्जनता, कधीही म्हणायचे नाही कंटाळा आला ..हे शिकायचे.. आपले कुटुंब एकत्र करून दर्जेदार अभिवाचन कार्यक्रम करण्याचा इतिहास त्यानी घडविला.
सूर्यकांत पाठक..
उत्तम वलयांकित लेखिका , वक्त्या असूनही त्यांनी कधी माणुसकी कधी सोडली नाही..
हेच त्यांचे वैशिष्ठ्य होते..
नीलिमा गुंडी..
त्यांनी गोनिदांच्या कादंबऱ्या ज्या पद्धतीने
अभिवाचन केले त्याची विशेष नोंद घ्यायला हवी. भाषा किती प्रकारे संजीवक असते..त्याचा प्रत्यय श्रोत्यांना त्यातून येत होता. शब्दोच्चार, स्वराघात, शब्दाचा रोख आणि भाषेचा पोत याचा संस्कार त्यातून येत होता.यातून त्यांनी मराठीच्या वाचन संस्कृतीला नव संजीवन दिले.
त्यानी आपल्या वडिलांच्या साहित्याचे मोल ओळखून आपला वेळ देऊन ते पुढच्या पिढीपर्यत पोचविण्याचे काम केले.
राजन लाखे..
शांता शेळके यांची पैठणी..त्यानी शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी निमित्त त्यानी आपल्या शैलीत कशी सादर केली त्याचा अनुभव दिला.
विनोद कुलकर्णी..
शाहू कॉलेज मध्ये त्या उत्तम शिकवायचा..त्यांचे नाव पुण्यातल्या रिक्षावाल्याने कसे काढले त्याची ताजी आठवण..
निलेश देशपांडे..
त्या स्वयंप्रकाशी होत्या..त्यांनी आपली स्वतंत्र शैलीत निर्माण केली होती.
त्या अतिशय भावना प्रधान होत्या. कुठे थांबायचं हे त्यांना माहीत होते..आता बास..आयुष्याबद्दल त्यानी तेच केलं.
नारायण ढेपे..
त्यांच्यामुळे अनेक लोकांना पहाता आले.. अनुभवता आले.
त्यांनी घडविले..संस्कार केले..माझ्यासाठी सावली होत्या त्या..माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी शाहू कॉलेज मध्ये घडविले.
बबन मिंडे ..
मुलांनी काय चांगले वाचवे..काय चांगले पहावे यांचे संस्कार बाईंनी आमच्यावर केले. पाठ्यपुस्तकं यांच्याशिवाय दुसरे वाचायला न मिळणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुलाला त्यानी जवळ केलं आणि समृद्ध आयुष्य कसं असावं ते शिकविले..ती श्रीमंती माझ्याबरोबर राहील..
उल्हासदादा पवार..
आई..वडिलांनी केलेले उत्तम संस्कार यातून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्या घडल्या.
त्यांच्या चेहऱ्यावरून मनातली प्रसन्नता ..सात्विक भाव काय असतात ते कळत होते.
निरपेक्ष , प्रत्येक माणसावर निरागस प्रेम करणाऱ्या वीणाताई.








प्रास्ताविक मसापच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी केले.



शब्दांकन..सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Saturday, October 26, 2024

नृत्य निपुण प्राजक्ता माळी..ह्यांच्या 'फुलवंती'च्या उत्तम निर्मितीला दाद द्यायलाच हवी..!

 


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या  "फुलवंती" या कादंबरीवर आधारित   हा चित्रपट हा पेशवेकाळात असलेले कलेचे महत्व आणि बुद्धिमान व्यक्तींचा असलेला मान  दाखविणारा एक उत्तम आविष्कार.... म्हणजे फुलवंती..! 


हा चित्रपट काढणे आणि तोही इतक्या देखण्या पद्धतीने सादर करणे हे खरोखरच शिवधनुष्य..ते पेलण्याचे  साहस या चित्रपटातून यशस्वी झाल्याची नक्कीच नोंद घ्यावीशी वाटली.


प्रत्येक घटना..त्यातल्या व्यक्तिरेखा तुम्हाला खिळवून ठेवतात.. नृत्याची भक्कम  बाजू तुमचे मन प्रसन्न तर करतेच पण त्यासाठी घेतलेले प्रयत्न बेफाट आहेत..






हा चित्रपट कलाप्रेम ..आणि दिलेल्या  शब्दांचे महत्व  पेशवे काळात किती असामान्य होते ..आणि न्याय देणारे पेशवे कलेचा आणि बुद्धिमत्तेचा किती आदर करीत होते..त्याचेच दर्शन फुलवंती मध्ये घडते..


चित्रपटात अनुभवताना व्यक्तिरेखांचे संवाद तुम्हाला त्यातून नेमका परिणाम देतात..प्रवीण विठ्ठल तरडे..यांनी ही बाजू समर्थपणे पेलली आहे.

कुठेही अवस्तवता नाही..नेमके काय साध्य करायचे आहे ते लेखक जाणून आहे..प्रसंगांचा परिणाम साधणारे आणि व्यक्तिरेखांचे महत्व ओळखून चित्रपट घडत राहतो..

नर्तकीचे आणि नृत्य कलेचे महत्व ओळखून फुलवंतील दिलेली  भरपूर स्पेस..यातून सौदर्य अधिकाधिक बाहेर येते..

पुण्यातील वातावरण दाखविताना थोडक्या व्यक्तिरेखांच्या रूपाने सहज उलगडत जाते..


पेशवाई..दरबार.. त्यांची पात्रनिवड..आजूबाजूचे वाडे..वाड्यांची सुंदरता..प्रसन्नता..दरबाराचे भव्यपण..

नृत्य कलेतील बारकावे.. घुंगरूचे महत्व..पखावाजातील नादमयता..त्यासाठी शास्त्रीबुवा  यांनी घेतलेले परिश्रम..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नृत्याला महत्व देऊन नटविलेली  अतिशय उत्तम गाणी..


नाजूक आणि कलानिपुण फुलवंती..प्राजक्ता माळी यांच्या उत्तम ..देखण्या सादरीकरणातून चित्रपटभर भारून  राहते..



देखणा..रुबाबदार..आणि बुद्धिमान असलेल्या 

व्यंकट शास्त्री यांना गाष्मिर महाजनी यांनी भारदस्त ..आणि नेमक्या भावनिक प्रसंग साकारून उभा केला आहे..

लक्ष्मी या व्यक्तिरेखेत सोज्वळ रुपात देखण्या दिसत होत्या स्नेहल तरडे.. पण भुमिकेपेक्षा दिग्दर्शक म्हणून त्या अधिक प्रभाव पाडतात..

प्रसाद ओक, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी,  समीर चौघुले,  चिन्मयी सुमित,  मंगेश देसाई,  वनिता खरस्त, जयवंत वाडकर...साऱ्याच कलाकारांनी चित्रपट अधिक परिणामकारक केला आहे..


अविनाश - विश्वजित या संगीतकार जोडीने गाणी ऐकत..नव्हे तर पहात रहावीत अशी छान घडविली आहेत.

आर्या आंबेकर, वैशाली म्हाडे, राहुल देशपांडे,  बेला शेंडे यांनी गायलेली गाणी मनावर अधिराज्य गाजवतात.. यातली गीते स्नेहल तरडे , वैभव जोशी आणि विश्वजित जोशी  ,डॉ. प्रसाद बिवरे, मंदार चोळकर याची आहेत..त्यांना दिव्य मराठीचा गंध आहे.. आहेत..त्याला अर्थ आहे.



घुंगरू आणि पखवाज यांचे नाते उलगडत 

जाणारा हा चित्रपट..

चित्रपट पहातो त्या महेश लिमये यांच्या उत्कृष्ट सिनेफोटोग्रफीच्या माध्यमातून..

रंगसंगती आणि परिणामकारकता सारेच यात उठून दिसते..

खरे तर बरेच काही लिहिण्यासारखे आहे..पण शब्द संपतात..तिथे चित्रे दिसू लागतात..

तसा हा नेहमीच्या कौटुंबिक पठडीत नसलेला कलात्मक दर्शन घडविणारा इतिहास..सौदर्य आणि कला..शास्त्र याकडे लक्ष वेधणारा  चित्रपट बनविल्यांद्दल ..एक मराठी  प्रेमी म्हणून प्राजक्ता आणि स्नेहल आणि सर्व  त्यासाठी कलाकारांचे आभार मानले पाहिजेत. 

तुम्ही आम्हाला अधिक समृध्द केलेत..

चित्रपट गृहात जाऊनच या फुलवांती.. चा अनुभव घेणे अधिक उत्तम राहील..


प्राजक्ता माळी यांच्या उत्तम  आणि धाडसी निर्मितीमुळे  हा चित्रपट एक सुंदर कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळते..


या गोष्टी खटकतात....

एक म्हणजे फुलवंती.. यांची भाषा..मध्येच त्या ग्रामीण बोलीत बोलतात..तर बरेच वेळा..शुद्ध मराठीत..आणि कशी दोन्हींची सरमिसळ होते..


दुसरे म्हणजे.. फुलवंती.. यांना पुण्यात नृत्य सादर करण्यासाठी बोलाविले जाते..तेंव्हा त्या तलावात नहात असतात.. ह्याची काय आवश्यकता होती.. 

यमुनाजळी..किंवा.. देरे कान्हा..डोक्यात होते की काय..नकळे..!


उच्च बुद्धिमत्ता असलेला माणूस..सहज बाहेरच्या न जाणाणाऱ्या स्त्रीला  चुकून वेश्या..म्हणणे..

आणि पखवाज वादक होण्यासाठी असा आटापिटा करणे..


एक नोंद..म्हणजे चित्रपट संपल्यावर जेंव्हा  सहभागी कलाकारांची नामावली दाखविली जाते ...त्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडत नाहीत..शेवटचे नृत्य अनुभवत असतात..हा परिणाम चित्रपटाचा..




- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com 


#Prajakttamaali #snehaltarde 

 #फुलवंती #Fulwanti