Tuesday, August 15, 2017

वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर

महाराष्ट्रातील नामवंत तमाशा कलावंत स्वत:ला 'मास्टर` म्हणून संबोधतात. याच परंपरेतले एक वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर. चंद्रकांत ढवळपुरीकर हे देखील स्वत:ला मास्टर म्हणवून घेत. त्यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला होता. वगसम्राट आणि खलनायक म्हणून परिचित असलेले ढवळपुरीकर आज आपल्यात नाहीत, पण एक कर्तबगार तमाशा कलावंत म्हणून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा तमाशा सृष्टीत निर्माण केला होता.

1932 साली ढवळपुरीकर ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे जन्मलेले चंद्रकातजी केवळ तिसरी इयत्ता शिकले. पण अनेक वगातील भूमिका त्यांना तोंडपाठ असत. 1943 साली देवीदासबुवा राधेकर यांच्या तमाशात ते नाचकाम करीत. विष्णुबुवा बांगर बेव्हेकरसह देवीदासबुवा राधेकर अशा फडात ते काम करीत असत.

आचाऱ्याच्या हाताखाली राहून बिगारी काम करणाऱ्या चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी पायात चाळ बांधून, केस वाढवून नाच्याचे काम सुरू केले. 1955 सालापासून ते सहनायकांच्या भूमिका करू लागले. पुढे चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडीक पुणेकर या जोडीने अनेक वर्षे महाराष्ट्राचे रंजन केले. भिल्लांची टोळी, महाराष्ट्र झुकत नाही, लग्ना आधी कुकू पुसले, असे पुढारी ठार करा, शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेश्वर माझी माऊली, इंदिरामठाचे गुपीत, महाराष्ट्र तू जागा राहा अशा अनेक वगनाटयांमध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी गायक, खलनायकाचे काम केले.


प्रा.डॉ.प्रकाश खांडगे


No comments:

Post a Comment