Thursday, January 6, 2011

अभिवाचनातून वेदनेचा पुन:प्रत्यय


आदरणीय वीणाताई यांस,

मी केदार केसकर. पुण्याचा रहिवासी. पुण्यातील झेन्सार या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असल्यामुळे मराठीची ओढ शांत बसू देत नाही. वेळ मिळेल तसा काहीतरी लिहित असतो, वाचत असतो, विचार करत असतो. गोनीदांच्या साहित्यातील 'शितू' मी सर्वप्रथम वाचली. त्यानंतर ४-५ दिवस मी भयंकर काढले. शितू डोक्यावरून खाली उतरण्यास तयारच होईना. एखाद्या मुलीशी कधी संवाद करण्याचा प्रसंग आल्यास वाटायचं, 'शितू'इतकी सोशिकता, सोज्वळपणा, सौंदर्य, समजूतदारपणा या मुलीत असेल काय? बराच काळ मनात खोलवर कुठेतरी काहीतरी अगम्य चालू होतं. आजकाल ही अशी निरागस व्यक्ती मिळणं अवघड आहे. त्यात आमची पिढी न संपणार्‍या स्पर्धेमुळे, आर्थिक ओढाताणीतून, न पेलणार्‍या जबाबदार्‍यांमुळे त्रस्त आहे आणि या खरं तर नको असलेल्या अतिव्यस्ततेमुळे आम्ही थकून गेलो आहोत. म्हणून न बोलता समजून घेणारं कोणीतरी असावं असं खूप वाटतं. शितू अजुनही मनाच्या कोपर्‍यात लपून बसलेली आहे ते त्यामुळेच.


गोनीदा, कुसुमाग्रज, विंदा, पुल, ना. सि.फडके, भा. रा. तांबे या सार्‍या मोठ्या लेखकांना, कादंबरीकारांना, कविंना भेटण्याची संधी न मिळणं ही आमच्या पिढीची मोठी शोकांतिका आहे आणि म्हणूनच हा अभिवाचनाचा कार्यक्रम पहाण्याची संधी मला लाभतेय हे मी माझं भाग्य समजतो. परवा "पडघवली" ऐकण्यासाठी मी आलो होतो पण जागा मिळाली नाही म्हणून काल जरा लवकरच आलो. कुणा एकाची भ्रमणगाथा ऐकली. तशी ही कादंबरी मी बरीच आधी वाचलेली आहे. ही कादंबरी लिहीली गेली त्यावेळेस मी फक्त उणे २५ वर्षांचा होतो. पण आज ह्या कादंबरीचं तुम्ही केलेलं छंदबद्ध अभिवाचन ऐकून मी त्यात पुन्हा कुठेतरी हरवून गेलो. त्यातील वेदनेच्या नितळ दर्शनाने हरखलो. हादरलो. पुरता हादरलो. या अनुषंगाने मनात घोळणारे विचार आपल्याला कळवावेसे वाटले. मी वयानी लहान आहे म्हणून माझ्या बालबुद्धीला न पेलणारे काही प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरेही बहूतेक त्या प्रश्नांमध्येच दडलेली असावीत. वेळ येईल तेव्हा ती मिळतील असं वाटतं.


"विपदस्सन्तु न: शश्वत्" या मागील कुंतीची भूमिका मला काल जाणवली. कळली असे मी म्हणणार नाही. वेदना... सार्‍या सुखाचा उगम बहूतेक या वेदनेपोटीच होत असावा. म्हणजे सुख हे सुद्धा वेदनेचे रूप? आणि आनंदाश्रू म्हणजे? का ती ही वेदना? म्हणूनचं का प्रसूतीच्या वेळेस होणार्‍या दु:खाला प्रसववेदना म्हणतात?


मला दहावीत एक कविता होती. कुणाची होती हे आता आठवत नाही.


दु:ख नको टीचभर हृदयाचे

दु:ख नको ओंजळभर प्रीतीचे

दु:ख असे द्या विशाल

निजकवेत येईल क्षितिजासह हे वर्तुळ...


दु:ख जेव्हा व्यापक, सर्वसमावेषक आणि उदात्त होतं त्यावेळेस वेदनेचा जन्म होतो का? खरतर वेदना हे दु:खाचं बाळ. पण कधीतरी एखाद्या समंजस पोरीने आपल्या आईबापाला समर्थपणे साथ द्यावी असं हे रूप. दु:खापेक्षा वेदना अधिक जवळची वाटते ती बहूतेक यामुळे.

पुन्हा वेदनेचा हुंकार वेदनेच्या प्रगल्भतेवर अवलंबून असतो. वेदनेची प्रगल्भता जितकी अधिक तितका हुंकार अधिक स्पष्ट आणि जितका हुंकार अधिक स्पष्ट तितकी त्यातून उमटणारी स्पंदने अधिक तीव्र. मग ती स्पंदने दुसर्‍याला जाणवतात पण तोपर्यंत परिस्थिती गंभीर होऊन बसते. यशोदेने शेवटी थांबविण्याचा प्रयत्न केला असता गोनिदांनी यशोदेला "नाही यशोदे, मी आता मागे फिरून तुला लहान करणार नाही" असं म्हटलं या वेळेस त्यांच्या वेदनेतील प्रगल्भतेचं दर्शन मला झालं. "दुरितांचे तिमिर जावो" हे मागणं माऊलींनी मागितलं ते या अलौकिक वेदनेच्या पोटीच का?


हे असे प्रश्न कालपासून माझ्या डोक्यात घोळत आहेत. तुमच्या अभिवाचनातून या नितांत सुंदर वेदनेचा पुन:प्रत्यय तुम्ही मला दिलात म्हणून मी तुमचा ऋणी आहे. जन्मच जर वेदनेपोटी होत असेल तर ही वेदना मनुष्यजन्माला कर्णाच्या कवच कुंडलांसारखी चिकटून रहाणार हे उघड आहे. पण त्या वेदनेचा हुंकार कान देऊन ऐकणारे जगात बोटांवर मोजण्याइतके आहेत. ज्यांना तो ऐकू येतो ते जाणतात की वेदना सरून गेली की संवेदना उरते आणि माणसाचा व्यास अजूनच मोठा होतो. आकाशावेरी गेलेली ही माणसं... यांना काय म्हणायचं?

दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करायचा एवढच्!


तुमचा नम्र,
केदार केसकर

No comments:

Post a Comment