Wednesday, February 2, 2011

हा गानप्रवास आता संपला


महाराष्ट्रात आणि देशभरात असं एखादंच शहर असेल की जिथं पंडित भीमसेन जोशी यांचे तानपुरे झंकारले नाहीत. ख्यालगायकीच्या या राजाने हिंदुस्तानी संगीत सर्वदूर पोहोचवलं. किराणा गायकीला लाभलेल्या या समाजमान्यतेचं आणि प्रतिष्ठेचं श्रेय निर्विवादपणे भीमसेन यांनाच द्यावं लागतं.

किराणा गायकीचा आपल्याला जवळून ज्ञात असलेला प्रवास खाँसाहेब, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी असा आहे. संगीतातील परंपरांचे प्रवासही पाहण्यासारखे असतात. खाँसाहेबांचा आवाज अप्रतिम सुरेल होता; पण त्यांच्या गाण्यात बोलतान नव्हती. त्यांच्या सुरेल आलापीला रसात्मकता होती. सवाई गंधर्व तर त्यांचेच शिष्य! त्यामुळे त्यांची छाप भीमसेनांच्या गाण्यावर पुरेपूर होती. विशेषत: स्वर लावण्याची भीमसेनांची पद्धत थेट गुरुजींसारखीच! अर्थात भीमसेनांचं गाणं खूप बदललं. किराणाची वैशिष्टय़ं तिच्यात होतीच शिवाय दीर्घकाळच्या अभ्यास- चिंतनातून आणखीही बरेच त्यांनी साध्य केलं. किराणाची गायकी मुख्यत: तंत अंगाची आहे. गायकी स्वरप्रधान असली तरी आवाज लावण्याची या घराण्याची पद्धत अन्य घराण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. ती गळ्यावर ताण देणारी आणि थोडी कृत्रिम आहे असं टीकाकारांना वाटतं. हा उणेपणा, तंत्रदोष असला तरी तिचे नाते ‘गोबरहारी बाणी’शी आहे. कारण आर्तता आणि भक्तिभाव हे तर या वाणीचे विशेष. भीमसेनांच्या आलापीत हे भाव किती उत्कटतेनं प्रकट होतात! स्वरांची आस अखंड टिकणे आणि एका स्वरातून दुसरा स्वर निर्माण होणे हे तंत अंगाचे अविभाज्य विशेष मानले जातात. भीमसेनांच्या प्रत्येक मैफलीत या वैशिष्टय़ांचा प्रत्यय पुरेपूर येतो. आकारयुक्त आलापी ही किराणाची खासियत नव्हे. बंदिशीतील किंवा चिजेतील मुखडय़ाच्या अंगाने जाणारी आलापी किराणात केली जाते. भीमसेनांच्या आकारयुक्त आलापीत हे दोन्ही गुणविशेष आढळतात. त्याबाबतीत केसरबाईंचा प्रभाव ते स्वत: मान्य करत. एकेक स्वर वाढवून रागाचा विस्तार करण्याची पद्धत किराणा घराण्यात आहे. गंधारापर्यंत या पद्धतीने स्वरविस्तार करून एक भारदस्त परिणाम साधला जातो. वेगवेगळ्या स्वराकृतीतून रागाची प्रतिमा उभी राहाते. त्याचीच छाया मैफलीवर पसरते. आसदार स्वर आणि स्वरांवरील ठहराव यातून गाणं रंजक कसं करायचं याची हातोटी भीमसेनांना साधली. सवाई गंधर्वाकडे शिकत असताना यातले काही बारकावे समजले. त्यातूनच मैफल जिंकण्याचा मंत्रही त्यांना अवगत झाला.

हिंदुस्तानी संगीताच्या गेल्या शंभर- सव्वाशे वर्षाच्या इतिहासात अल्लादिया खाँ, भास्करबुवा बखले, वझेबुवा, अब्दुल करीम खाँ, फैयाज खाँ आणि मंजी खाँ यासारख्या मातब्बर गवयांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं. प्रत्येकाच्या आवाजाची जात वेगळी. गाण्याचा ढंग वेगळा आणि ज्याचं त्याचं सामर्थ्यही भिन्न गुणावर आधारित होतं. या परंपरेतच भीमसेनांचं स्वत:चं स्थान होतं आणि आहे. ते त्यांनी त्यांच्या आवाजानेच निर्माण केलं. त्यांचा आवाज अस्सल पुरुषी- मर्दानी होता. आवाज आणि स्वर या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आवाज हे साधन आणि स्वर हे माध्यम आहे याची जाणीव त्यांना होती. त्यांचा आवाज निसर्गदत्त गोड नव्हता. विशिष्ट त-हेच्या मेहनतीनं त्यांनी तो घडवला होता. त्या आवाजातून प्रकटणा-या स्वरांची किमया अद्भूत आहे. उत्तम जुळलेल्या तंबो-याच्या स्वरांच्या पार्श्वभूमीवर भीमसेनांनी पहिला आकारातला षड्ज लावला की सहजपणे श्रोते ‘व्वा!’ असा उद्गार काढत. आवाजाची झेप आणि स्वरांची फेक मोठी जबरदस्त होती. त्यांना दमसास स्तिमित करत असे. मर्दानी आवाजात मार्दवही होते. स्वराची आस आणि षड्जाशी असणारं नातं यामुळे ते श्रोत्यांना खिळवू ठेवत. आलापी केवळ आकाराची नाही. नुसत्या आकाराने रुक्षता येऊ शकते. स्वरात गोलाई आणि सच्चाई हवी. ती पुरेपूर होती. संथ, संयमित, भारदस्त आलापीतून रागविस्तार करत गाण्याचा उत्कर्ष कसा साधायचा याचं मर्म त्यांना हिराबागेतल्या पहिल्या मैफलीपासून साधलं होत. त्यांची मैफल रंगली नाही असं सहसा घडलं नाही.

केसरबाईंची आकारयुक्त आलापी आणि अमीरखाँची उत्तुंग तान भीमसेनांनी आपल्या गायकीशी एकरूप केली होती. चारी अंगांनी फुलत जाणारी आलापी आणि तानांचे अलंकरण यांचा आकृतीबंध त्यांच्या कोणत्याही मैफलीत प्रत्ययाला येई. प्रदीर्घ तानांच्या सरी म्हणजे स्वरवर्षावच! म्हणून भीमसेनांची अशी अनेक गुणांनी नटलेली मैफल हा श्रवणसुखाचा अत्युच्च आनंद देणारा अनुभव ठरायची.

मैफल कोणतीही असो, तंबो-यांच्या मध्यभागी भीमसेनांची सावळी मूर्ती गायला बसली की, पहिल्या षड्जातच मैफल काबीज व्हायची आक्रमक ढंगाची, काहीशी विरश्रीयुक्त गायकी म्हणता म्हणता रंग जमवू लागे.

भीमसेन मैफलीत काय गाणार अशी कुतूहलजन्य उत्सुकता त्यांच्या श्रोत्यांना सहसा नसे, कारण ते ठराविकच राग गात. अनवट राग गाण्याकडे त्यांचा कल नसे. याबद्दल त्यांच्यावर घेण्यात येणारे आक्षेप त्यांनी कधी नाकारले नाहीत. उलट ते याचे सार्थ स्पष्टीकरण देखील करत. प्रत्येक गायकीचे मैफलीचे, गळ्यावर चढलेले राग ठराविकच असतात. प्रचलित, आम रागांतील सौंदर्यच अधिक समर्थपणे दाखवता येतं असं त्यांना वाटे. भीमसेनांना सावनीपेक्षा बिहाग जवळचा वाटणं स्वाभाविक आहे. ‘कैसे सुख सोवे’ सारखी पारंपारिक बंदिश गाऊन भीमसेन सर्वागाने बिहाग राग साकारत.

तोडी, मियाँमल्हार, ललत, मुल्तानी, दरबारी, शुद्धकल्याण, अभोगी, मालकंस, मारुबिहाग, शुद्धसारंग, वृंदावनीसारंग हे पूर्वागप्रधान राग म्हणजे किराणा घराण्याचं राखीव क्षेत्र असं म्हटलं जायचं. त्यातही हे राग भीमसेनांकडूनच ऐकावेत असे वाटे. सकाळच्या मैफलीत तोडी, ललत, कोमल रिषभ आसावरी हेच राग ते सातत्याने गात पण त्याची गंमत वेगळीच असे. कोमल रिषभाची गडद छाया या गाण्यावर रेंगाळत राही. आजही तेच सूर कानात आहेत. सायंकाळच्या मैफलीतला पूरिया मारवा, मारवाश्री असो, किंवा रात्रीच्या मैफलीतला दरबारी, अभोगी, मियाँमल्हार, मालकंस, मारुबिहाग; ख्यालाच्या विस्तारानंतर तिन्ही सप्तकातील ताना सुरू झाल्या की सभागृह चैतन्यमय होऊन जात असे.

भीमसेनांनी ख्यालगायकी ख-या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत नेली. रागाचं शास्त्र कळलं नाही, बंदिश माहिती नसली तरी गाणं भावतं, भुलवतं! मैफलीत ज्या दर्जानं ते ख्याल पेश करायचे तेवढय़ाच ताकदीनं ठुमरी गायचे. ठुमरी गायनातील अभिजातता व सौंदर्य त्यांच्या गाण्यात होतं. जडणघडणीच्या काळात त्यांनी बुजुर्गाचं गाणं खूप ऐकलं होतं. त्यात बडे गुलामअली, सिद्धेश्वरीदेवी, बेगम अख्तर यांचाही समावेश होता. ठुमरीचे संस्कार त्यांच्यावर त्यातूनच झाले. कन्नड भाषक भीमसेन यांना ठुमरीचा अस्सल ढंग कसा उमगणार, याबद्दल काहींना शंका होती. ठुमरीचं लालित्य, नखरा आणि दर्द भीमसेनांची कोणतीही ठुमरी ऐकली तरी येईल.
स्वराकृतीबरोबर शब्दाकृतींनाही ठुमरीत स्थान असतं. शृंगाराबरोबर विरह, व्याकुळतेचं दर्शन भीमसेन कमालीच्या उत्कटतेनं घडवत. मिश्र काफीतली ‘पिया तो मानत नाही’ किंवा जोगियातील ‘पिया मीलन की आस’ ऐकताना भीमसेनांचं ठुमरीवरचं प्रभुत्वही प्रत्ययाला यायचं.

ख्यालगायकीच्या या राजाने भजनगायकीतही स्वतंत्र ठसा उमटवला. रागदारी मैफली एवढीच ‘संतवाणी’ची मैफल रंगे. आठ- दहा हजाराच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या भजनात आहे. ख्यालाएवढीच तल्लीनता भजनातही. भजन गायकी हा त्यांचा स्थायीभाव नव्हता. पुरंदरदास, जगन्नाथदासांची कन्नड भजनं, ब्रह्मानंदाची हिंदी भजनं व रामभाऊंकडून घेतलेले मराठी अभंग ते पूर्वी गात होते. ‘श्रीनिकेतना पालयमा’, ‘भाग्यदा लक्ष्मीवारगा’, ‘कायो करुणानिधे’, यासारखी कन्नड भजनं मराठी भाविकांनासुद्धा ठाऊक आहेत. ख्याल आणि ठुमरीबरोबरच भजन गाण्याची परंपरा किराणात आहे. भीमसेनांनी मात्र सांप्रदायिकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाची पठडी आणि भीमसेनांची ‘संतवाणी’ यात साम्य आणि भेदस्थळे बरीच असली तरी मराठी भाषक जनसामान्यांना भीमसेनांनी गायिलेले अभंग आपलेसे वाटतात. अभंग गायनातील लडिवाळ भावामुळे ही जवळीक साधली जात असावी.

प्रकृति अस्वास्थ्यामुळे बालगंधर्व आणि सवाई गंधर्व अखेरच्या काळात खासगी वा जाहीर मैफलींतून भजनं गाऊ लागले होते. पलुस्करांनी तर भजन हे संगीत प्रसाराचं साधन मानलं होतं. नारायणराव व्यास, ओंकारनाथ, द. वि. पलुस्कर यांच्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका एके काळी लोकप्रिय होत्या. या पार्श्वभूमीवर भीमसेनांच्या ‘संतवाणी’चे वेगळेपण लक्षात येते.‘संतवाणी’चा कार्यक्रम म्हणजे ‘भागवत धर्माचं स्वरचित्र’च ठरे. भीमसेन मैफलीत भैरवी म्हणून भजनं गात होते. ‘जो भजे हरिको सदा’ किंवा ‘कायो करुणानिधे’, ‘अगा वैकुंठीच्या राया’ ही उदाहरणं बोलकी आहेत. ‘गुळाचा गणपती’ या पु.लं.च्या चित्रपटातलं, गदिमांचं ‘इंद्रायणी काठी’ हे गीत भजनासारखंच लोकप्रिय झालं.

1968 ते 1972 या काळात भीमसेन पुणे आकाशवाणीवरच अभंग गात होते. राम फाटक यांनी चाली दिलेले अभंग म्हणजे भीमसेनांचे भजनगायकीचं एक नवं उत्कट रूप ठरलं. ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहणे’ पुणे केंद्रावरून प्रसारित झालं आणि हळूहळू ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांसारख्या संताच्या रचना भीमसेनांच्या आर्त स्वरांमुळे श्रोत्यांच्या ओठी येऊ लागल्या. राम फाटकांचं आणि भीमसेनांचं छान जमलं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या अभंगांच्या एच. एम. व्ही.नं ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफिती काढल्या आणि त्यातूनच 1972 मध्ये ‘संतवाणी’चा कार्यक्रम आकाराला आला. पुण्या- मुंबईतल्या वातानुकूलित सभागृहापासून ते आळंदी- पंढरपूरच्या देवस्थानासमोरील उघडय़ा पटांगणापर्यंत ‘संतवाणी’चे कार्यक्रम रंगू लागले. भीमसेनांच्या अभंगगायनात ही तन्मयता आली कोठून? बहुधा आध्यात्मिकतेचा हा धागा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच असावा. अभंग गायनातील प्रासादिकता त्यांनी आपल्या गुरुजींकडून घेतली असावी. सवाई गंधर्व ‘रामरंगी रंगले मन’ किंवा ‘कान्होबा तुझी घोंगडी’ अप्रतिम म्हणत. तीच उत्कटता भीमसेनांच्या गाण्यात प्रकटत असे. भीमसेन‘नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’ ही ओळ म्हणतात, तेव्हा श्रोत्यांनाच विठ्ठलभेटीचा प्रत्यय येतो. ‘अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा’ म्हणताना तुकारामाच्या काव्यातील व्यापकतेचा अनुभव येतो. ‘विठ्ठल गीती गावा’, ‘कसा मला टाकून गेला राम’, ‘राजस सुकुमार’ या रचना मुद्दाम ऐकायला हव्यात. त्यातील काही ओळींची पुन्हा येणारी आवर्तने श्रोत्यांना डोलायला लावतात.
ख्याल, ठुमरी नाटय़गीत आणि भजन गाणा-या भीमसेनांनी नवे राग बंदिशी रचल्या, चित्रपटातून पार्श्वगायन केले. गोपालकृष्ण भोबे यांच्या ‘धन्य ते गायनी कळा’ नाटकाला संगीत दिले. अर्थात नवे राग बांधणं व चिजा रचणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, ती त्यांची वृत्ती नव्हती; पण ललतभटियार, हिंदोलललत, कलाश्री यासारखी रागरूपं ही भीमसेनांचीच निर्मिती आहे. या रागातल्या चिजा आता मैफलीतून परिचयाच्या झाल्या आहेत. ‘कलाश्री’ मधील सरगम अनोखी आहे.‘ख्यालगायकीच्या राजा’चा हा गानप्रवास आता संपला आहे.

प्रसन्नकुमार अकलूजकरhttp://www.prahaar.in/collag/36329.html

No comments:

Post a Comment