Tuesday, February 22, 2011

नाटकातील प्रायोगिकता - महेश एलकुंचवार


आमची प्रायोगिकता अधिकधिक अनुदार व संकुचित तर होवू लागली नाही? प्रायोगिकतेचा एक आम्हाला पटणारा कोश आमच्या भोवती विणून त्यातच आम्ही मग्न राहीलो, असे तर झाली नाही? आम्ही करतो तेच खरे (व म्हणून दुसरे करतात ते रद्दबातल), असा गंड तर आम्हा प्रायोगिकांमध्ये निर्माण झाला नाही? परिणामी आमच्या प्रायोगिकतेलाच कोती व अल्पजीवी तर केले नाही?

मुळात प्रायोगिकता म्हणजे परंपरेविरुद्ध बंडखोरी असे समीकरण आहे. पण जिच्याविरुद्ध बंड करायचे ती परंपरा आधी समजून घ्यावी लागते. येथे मी परंपरा हा शब्द फक्त नाट्यपरंपरा एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरत नसून जीवनाच्या सर्व अंगांमधली परंपरा, एका संपूर्ण जीवनशैलीची परंपरा एवढ्या व्यापक अर्थाने वापरत आहे. ते बंड अखेर जीवनामधल्या कुठल्य तरी अस्विकारणीय असलेल्या परंपरेविरुद्ध्च असते; कारण नाट्यपरंपरा ही अखेर त्या जीवनशैलीशी जुळलेली असते, किंबहुना तिच्यामधून उमलू आलेली असते. ही सर्व परंपरा समजून घ्यायची तर खूप अभ्यास हवा व पूर्वग्रहरहित, डोळस व्रुत्ती हवी. कुठल्याही देशातली नाट्यपरंपरा किंवा तीविरुद्धची बंडे ही काही निर्वात, निर्जन्तूक पोकळीत फुलत फळत नाहीत. त्या बंडखोरीमागे काही तात्विक विचार असावा लागतो व हा विचार नेहमीच जगण्याबद्दलच्या मूलभूत प्रश्नांमधून जन्मलेला असतो.

आपल्या नाटकामधली बंडखोरी जीवनविषयक तत्त्वचिंतनातून निर्माण झालेली आहे असे दिसत नाही. आपले बंड उपलब्ध शैलीविरुद्ध फक्त असते व ते एका निर्वात पोकळीत क्षण्काल घोंगावत राहाते. अश्या त-हेचे बंड वा प्रायोगिकता क्षणार्ध आपल्याला दिपवून टाकू शकते हे खरे, पण बहुदा ती काही काळ पेटल्यासारखी उजळते व स्वत:शीच जळून राख होते. परंपरा आपण सगळीच्या सगळी स्विकारत नसतो; कारण ती आपला चेहरा नित्य बदलते, बदलत्या काळाबरोबर नवे रूप घेते. हे असे होते कारण डोळस माणसे परंपरेतले कालबाह्य आहे ते वर्ज्य करून तिचे फक्त सत्त्व अंगी लावून घेतात. परंपरेचे सत्त्व व आधुनिकतेचा बळ ह्यांचा काही मेळ घालता आला, तर प्रायोगिकतेला एकाग्र व निश्चित दिशा मिळू शकते.

परंपरेचे भान असणे ह्याचा अर्थ एतद्देशीय असणे नव्हे. आपली परंपरा इतक्या संमिश्र विविध प्रभावाने घडत गेलीय की एतद्देशीय नकी काय ते ठरविता येणे कठीण आहे. आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यात, फक्त भारतीय परंपरांचा विचार करण्याऐवजी जागतिक परंपराअ समोरे जाण्याचा खुलेपणा व उमदेपणा दाखविता आला तर्च आपला सर्जनपिंड पुष्ट होत जाईल. जागतिक प्रभावांना व परंपराना आपण प्रतिरोध करतो, तो आपल्यात आत्मविश्वास कमी पडतो म्हणून तर नाही?महेश एलकुंचवार

No comments:

Post a Comment