Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.

रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.

दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.

पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.

आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली होती हे माठे भाग्यच म्हणायचे.

दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.


No comments:

Post a Comment