Thursday, February 10, 2011

कलेची चव

ज्ञानी, महाज्ञानी,सर्वगुणसंपन्न असा समुदाय तुम्ही अनुभवलाय?

मी अनुभवलाय. एका शहरात.


खरे तर त्यांनीच मला त्यांची स्वत:ची ’ती अशी’ ओळख करवून दिलीय.जे लिहितोय ते स्वानुभवातुन लिहितोय.सांगोवांगी नाही.

या शहरातील लोकाना एक वेळ ’ढिल्ला’ महटले तर एवढा राग येणार नाही,पण जर कोणी ’अज्ञानी’ किंवा ’गावंढळ’ म्हटले तर त्यांच्या पचनीच पडत नाही. तिळपापड होतो.अंगाची अगदी लाही लाही होते.

इंटरनेट यायच्या आधी आणि आल्यानंतरही केवळ यांना आणि यांनाच सर्व जगाची माहिती असते वा असू शकते.भले यांच्या माहितीचा स्त्रोत केवळ दोनच वृत्तपत्रांशी निगडित असला तरी.

त्याचे कारणही आहे..’.गेला बाजार विद्यापीठातील ग्रंथालयात काम करणारा कोणीतरी सेवक त्यांचा दूरस्थ नातेवाईक असल्यामुळे जगातील सर्व ग्रंथ दोहो कर जोडून यांच्यापुढे सदैव उभे असतात,’असा भास वारंवार ते आपणा सर्वांना देत असतात.आणि हे अनुभवायला तुमच्या माझ्या सारखा नवखा त्यांच्यासमोर आला कि त्यांचा पतंग मस्त अवकाशात चंद्रापलिकडेही भरारी घ्यायला लागतो.

एखाद्या कवितेतील आशयाचा आनंद घेण्यापेक्षा त्यातील एका वेलांटीशी त्यांचा जीव खट्टू होवून अडकून राहतो.

मग ती कविता गेली उडत ,

जोपर्यंत ती वेलांटी यांच्या पठडीत बसत नाही तोपर्यंत यांचा जीव खालीवर होत राहतो.

यदाकदाचित यांच्या पोकळ ज्ञानघमेंडीचा तुम्हास कधी अनुभव आला तरी तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

केवळ तुमच्याशी नाही, तर सगळ्या जगाशीच या अशा अनेक विषयावरून त्यांचे कायम वाजत असते.



आपल्या नाकाशी किलोभर स्त्राव लोंबत असला तरी अमका ढमका कसा ’त्याच्या स्वप्नात चुकला’ यावर मार्निंग वाकला तासभर गुंतवून ठेवण्याचा अधिकार यांना दैवदत्त आहे.
आणि कमालीच्या इंटरेस्ट्ने तो वाजवत असतात.



त्यांच्या परखडपणा, स्पष्टवक्तेपणाचे तर क्या कहने?
’मी टरफले उचलणार नाही , मी शेंगा खाल्या नाहीत’ हे यांनी इतक्या वेळा घोकलेले आणि ओकलेले वाक्य असते कि
टिळक जिवंत असते तर त्यांनाही त्याचा अगदी वीट आला असता.
बरे टरफले मटारची आहेत आणि यांच्या तोंडात त्यातलाच मटार असला तरी...टरफले शब्द ऐकला कि त्यांचा ’असा परखडपणा’ बाहेर येणारच.मक्याच्या कणसाची पाने कुणी उचलायला सांगितले तर अर्धवट खालेल्ला बुट्टा तुमच्यासमोर नाचवून आधी शेंगांचा परखडपणा मांडतील.बरे टिळक रत्नागिरीचे..बाहेर गावचे.... तरीही यांचेच.


खरे तर , हे जरा उशीरा जन्माला आले अन्यथा सर्व संत मंहंत यांनी यांच्याच घरीच पाणी भरले असते.अधे मधे संत महंताच्या विविध परिक्षाही हे किंवा याचे सगे सोयरे उत्तीर्ण होत असतात.पढत मूर्खाची लक्षणे तर अगदी झोपेत सुद्धा पाठ म्हणून दाखवतील .पण जागे जाले की त्यातसुद्धा समर्थांनी थोडा बदल कसा करायला हवा होता, यावर तुमचा तास घेतील.

भारत तसा उत्सवप्रिय देश आहे,पण या मडळींची खासियतच काही विलक्षण आहे.ही मंडळी नुसती उत्सवप्रिय नाहीत तर,

ही मंडळी ’महोत्सवप्रिय’ आहेत.अनेक महोत्सव या शहरात बारा महिने चालू असतात.

या शहरात शिबिरे होत नाहीत. होतात फक्त महोत्सव.

...आरोग्य महोत्सव, तांदूळ महोत्सव, कोंबडी महोत्सव, बचत महोत्सव, गायन महोत्सव, वादनमहोत्सव, पैठणी महोत्सव, ह्रुदय महोत्सव.

अन न चूकता ही मंडळी प्रत्येक महोत्सवास मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

भले मग मागच्या स्टालवर शाबूदाणा वडा झोडण्यात ’ गिरिजादेवी’ ऐकणे सुटले तरी हे त्यांच्या गावीही नसते.
खरे तर ते त्याची तमाच करीत नाहीत.कारण ’यांची मैफिल’, ’ हे’ बसल्यावरच सुरु होते अन ”हे’ उठले की तत्क्षणी संपते.

अकबर बादशाहा किंवा विक्रमादित्य हे तर ते स्वत:स समजतातच.पण त्याचबरोबर, ’मागणी तसा पुरवठा’ या तत्वानुसार on demand दरबारातील नवरत्नांचा रोलही एकेक करून ते आरामात निभावतात.
खरे तर त्याच्या कडे ९०० रत्नांची क्षमता आहे पण पुरेशा रसिक गणसंख्ये अभावी ते आवरते घेतात.
अथवा त्यांना असेही वाटते कि आपले गुण समजणे हे इतरांच्या आवाक्याच्या पलिकडचे आहे त्यामुळे आपणच पामर जनतेस सांभाळून घेणे भाग आहे.

ही माणसे चरितार्थासाठी किरकोळ कामेही करतात.पण त्यांच्या आवडीचे काम विचाराल तर ’दुस-यास कमी लेखणे’.

त्याच्या दुर्दैवाने अशा पद्धतीची नोकरी कोठे उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबतीत ते विनामोबदला स्वयंरोजगाराचे तत्व अवलंबतात.

इतरांना त्यांची किंमत नसली तरी त्याची त्यांना फिकिर नसते.


मुकेश अंबानी या महाशयांकडे येत नाहीत, कारण ’ हे’ मुकेशला आपल्या घरी आमंत्रण देऊन बोलावत नाहीत म्हणूनच.

”तो तर केव्हाचा तयार बसलाय स्टार्टर मारून ’ अशी यांची धारणा.आणि समजा मुकेशदादा चुकून माकून कोठे यांना सापडलेच तर तुम्हास पेस्केल ( पगार ) आणि इन्क्रीमेंट किती? असे विचारण्याचे धारिष्ट्य यांच्या ठाई ठाई भरलेले आहे. यांच्या परवानगीशिवाय चालू असलेल्या इतर जगातील कोणत्याच कामाची यांना किंमत/पत्रास नसते.

यांच्या प्रत्येक गल्लीत ’आखिल भारतीय अबक मंड्ले’ असतात, ज्याची इतरत्र कोठेच शाखा नसते.
हे सगळे वाचल्यावर ज्यांना राग येणार आहे ती ”ही’ genuine माणसे नव्हेतच.
कारण सरळ आहे.
अनुल्लेखाने मारणे हाच यांचा साधा बाण आणि ब्रह्मास्त्र देखील..त्यामुळे इतरांनी उगीच यांचा पुळका घेऊ नये.

या नोट्मध्ये ब-याच शुद्धलेखनाचाच्या चुका जाणून बुजून करून ठेवलेल्या आहेत.

बाकी याच शहरात तासन्तास अभ्यास करणारी, सगळ्यांशी आपुलकीने वागणारी, प्रचंड सामाजिक कार्य करणारी अशी असंख्य व्यक्तीमत्वे माझे मित्र आहेत आणि मला त्यांच्याबद्दल आदरच आहे.अन तेही माझे मत जाणतातच.


पण फुकट रूबाब मारणा-यांबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे.
मित्रांनो यांच्या वागण्याचा ’त्रास आहे’ असे समजू नका.एक ’वैशिष्ट्यपूर्ण करमणूक’ देण्याचा मक्ता यांच्याकडे आहे ,
त्याचा आदर करा.
मला त्यांच्या कलेची चव समजायला जरा वेळ लागला.

तसा वेळ आपणापैकी कोणास लागू नये म्हणून हा पत्रप्रपंच
( हाही त्यांचाच लाडका शब्द बरका )

by

Shriniwas Deshpande

No comments:

Post a Comment