Friday, February 25, 2011

थरारेल वीट



स्वरभास्करा
नादपुत्रा
तळपत्या भास्करासम
ताप सोसताहेत
लोक
तप्त मनास शीतल करणारा
तुझा स्वर
नि, पोळलेल्यांना
स्वरानंद देणारा !
धुवांधार मर्दानी मल्हार स्वरांनी
कोमेजलेली मने
प्रफुल्लीत करणारा !
तुझा एक सच्चा
स्वर
दुभंगलेल्यांचा
अभंग
विठ्ठल
आसवांचे सांत्वन करणारा
वैश्विक जाणीवांना जोडणारा
रात्रीच्या धुंद सवाई गंधर्व
मैफिलीत
तुझे स्वर चांदणे होऊन बरसत
-- कधी कोसळती धारा
कधी प्रसन्न शिडकावा
कधी कधी करुणाही झरे !
मैफिल तुझी : मंत्रमुग्ध तल्लीनता
ब्रह्मानंदी टाळी !
मानवी संवेदनांना टोकदार करणारा
शब्दांना रडवणारा
शब्दांना खेळवणारा
शब्दांची दमछाक करणारा
करुण - आर्त - स्वर - भास्कर
सुंदर ते वेचून
सुंदर ते करून
पिढ्यानपिढ्या गारूड करणारा
संतवाणीच्या भक्तीस्वरांनी
शास्त्रीय संगीत ज्ञान
घरा-दारात, तळागाळात नेणारा
ममताळू
सीमा तरी कुठे होत्या
तुझ्या स्वरांना ?
स्वरांच्या लहरी
विविध लहरी
विश्व लहरी
मानवी ऐक्य
वैश्विक ऐक्य
साधणारा
अजूनी आपल्यातच........
आनंदयात्रीची स्वरयात्रा.......
अखंडित.......
ज्ञानियांच्या राजानंतर
संगीताच्या राजाची
समाधी लागली आहे !
टिपेच्या दाणेदार तानांची
मैफिल सजवीत आहेत
शांतता राखा.....
हळू बोला......
---- थरारेल वीट !



Suresh Tilekar
Pune
Ph.: 020-26330615

No comments:

Post a Comment