Monday, February 7, 2011

माझ्या स्मृति-सागरात


खरतरं नटसम्राट बालगंधर्व आपल्याला मायबाप म्हणत आणि आपण मायबाप आहात असंच आपल्याशी वागत. आपले लाड त्यांनी जेवढे पुरवले तेवढे अन्य कोणत्याही रंगकर्मीनं पुरवले नसतील. तत्कालीन नाट्यगृहामध्ये येणा-या प्रेक्षकांसाठी उच्च प्रतीचा महागडा उद आणि लोबाण वापरून सबंध वातावरण त्यांनी प्रसन्न केलं. आनंदराव आणि बावूराव पेंटरसारख्या विख्यात चित्रकारांकडून पडदे रंगवून घेऊन आपणासमोर श्रीमंतीची आरास मांडली. रंगमंचावरील हिरव्या चादरीवर, बादशाही इराणी गालिचे पसरून श्रीमंतीची आरास अधिक खुलवली. नाटकातील पात्रांच्या अंगावर झुळझुळीत आणि वस्त्र वापरून रजवाड्यांच्या शौक कसा असतो, याचं दर्शन घडवलं. मुकुटावर आणि आभूषणांवर ख-या सोन्याचा मुलामा चढवला. वर कळस म्हणून देवदुर्लभ गायनानं , ज्याने आपले कान तृप्त केले, त्यांचं स्मरण करून आम्ही रंगमंचावर वावरलो. आम्हीही आपल्याला मायबापच म्हणतो, पण आई वडिलांचं कोडकौतुक करण्याऎवजी आम्ही आपल्याकडून लाड करून घेतले . नटहट्ट पुरे करून घेतले. क्वचित तुमचा उपमर्दही केला. त्या सर्वांची स्मरणकहाणी म्हणजे हे माझे आठवणीतले मोती.

दर आठवड्याला मी माझ्या स्मृति-सागरात बुडी मारून, आपणासाठी एक मोती घेऊन येणार आहे. हा मोती बोरा एवढा टपोरा असेल, जोंधळ्याएवढा बारीकही असेल, गरगरीत गोल असेल, तर ओबड-धोबडही असेल. मोतियाच्या रंगाचा तेजस्वी असेल किंवा कळा गमवलेला तेजहीन असेल. पण असेल तो अस्सल मोतीच.

आयुष्याची उणी-पुरी साठ पासष्ट वर्ष मी रंगभुमीवरच वावरलो. अगदी प्रमुख भूमिकेपासून तो रंगमंचामागील कामगारापर्यंत सर्व भूमिका वठवल्या. क्वचित ठेचकाळलो, पडलो, रक्तबंबाळही झालो. पण, पुन्हा उठून चालू लागलो आणि रसिका, हे सारं आपल्या डोळ्यासमोरच घडलं, या सर्व प्रदीर्घ वाटचालीत अनेक मोठ्या माणसांचं बोट धरून मी चाललो. अनेक लहानांना बोटाला धरून चालविलं. ही सर्व लहान-थोर माणसं या लेखमालेच्या निमित्तानं मला खुणावताहेत, मला स्पर्श कर म्हणाताहेत. अनेक ब-या-वाईट घटना माझ्या भोवती फेर धरून नाचताहेत. या सगळ्याचं शब्दांकन करण्याचा माझा हा प्रामणिक प्रयत्न, गोड मानून घे एवढीच रसिका, तुझ्या चरणी प्रार्थना.

कोणाबद्दल कडू-वाईट मी लिहिणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. या सर्व गोष्टींच्या पल्याड मी गेलो आहे. आता ’पैल तीरी काऊ कोकताहे’ अशी माझी अवस्था आहे. पण तरीही मी माणूस आहे, स्खलनशील आहे. माझ्याकडून, प्रसंगी काही कोणाबद्दल कडू-गोड लिहिलं गेलं तर आपण मला क्षमा करालच. पण त्यांनीही मला क्षमा करावी अशी विनंती. एक मात्र नक्की, की आपल्या रंजनासाठी आम्ही ’लटके ना बोलू, सांगू वर्तमान खोटे’. जे असेल ते खरं असेल, तो योगायोग किंवा काल्पनिक आहे असं कोणी समजू नये!

आता पुढच्या आठवड्यात मी माझ्या आठवणीतील पहिला मोती आपणास अर्पण करण्यासाठी येणार आहे. असाच मी वर्षभर येणार आहे. आपणास ह्या मोत्याचा चारा भरवण्याचं श्रेय अर्थातच चाफ़ा.कॉमकडे आहे. मोत्याची झळाळी आणि चाफ़ाचा सुगंध लेवून आता ही मालिका अखंडित चालू रहावी अशी आपण माझ्यावतीनं त्या नियन्त्याकडे प्रार्थना कराल ना? करालच या विश्वासातला

आपला,
प्रभाकर पणशीकर

लेखनसहाय्य : अप्पा कुलकर्णी

http://chaphakar.blogspot.com/2010/05/blog-post_24.html

No comments:

Post a Comment